...पण सोन्याच्या दागिन्यांची तिजोरी फुटलीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:26 PM2022-09-21T14:26:41+5:302022-09-21T14:27:06+5:30
एका आठवड्यापूर्वी लक्ष्मी ज्वेलर्सच्या पाठीमागील बाजूस नेपाळी व्यक्तीने चायनीजचे दुकान येथील गाळ्यात भाड्याने सुरू केले
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : कामोठे, सेक्टर ११ मधील लक्ष्मी ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने दुकानातील तिजोरी फोडली. यातील चांदीवर डल्ला मारण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. संपूर्ण टेहळणी करूनच चोरीच्या उद्देशाने दुकान नंबर ११ हे दुकान भाड्याने घेतले होते. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी भिंतीला भगदाड पाडले व त्यातून आत प्रवेश करून तिजोरी फोडली. त्यातील १५ किलो चांदी घेऊन त्यांनी पलायन केले. मात्र सोन्याचे दागिने ठेवलेली तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने मोठी चोरी टळली.
एका आठवड्यापूर्वी लक्ष्मी ज्वेलर्सच्या पाठीमागील बाजूस नेपाळी व्यक्तीने चायनीजचे दुकान येथील गाळ्यात भाड्याने सुरू केले. यावेळी मालक आणि त्यांच्यात ५० हजार डिपॉझिट देण्याचे ठरले. तसेच प्रति महिना १५ हजार रुपये भाडे देण्याचे ठरले हाेते.
अनोळखी व्यक्तीच्या नावे घेतला मोबाइल
भाड्याने चायनीजचे दुकान सुरू करण्यापासून नेपाळी व्यक्तीने त्यांच्याकडील मोबाइलचा वापरही फक्त मालकाशी बोलण्यापुरताच केला असल्याचे पोलीस तपासादरम्यान समोर आले आहे. तसेच हा मोबाइल नंबर अनोळखी व्यक्तीच्या नावे घेतला होता. ज्वेलर्सचे दुकान फोडण्यापूर्वी त्यांनी या ज्वेलर्स दुकानाची पाहणी केली होती.