खुलेआम सुरू होती एमडीची खरेदीविक्री, घरात आढळला ३० लाखांचा साठा
By योगेश पांडे | Published: June 16, 2024 01:03 PM2024-06-16T13:03:51+5:302024-06-16T13:04:18+5:30
तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. तर उर्वरित चार आरोपींना पकडण्यात आले.
नागपूर : एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या आरोपींना पोलिसांना रंगेहाथ पकडले व एकाच्या घरातून तब्बल ३० लाखांचा साठा जप्त केला. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
महेंद्र नगर परिसरात रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास रहमानिया मशिदीजवळ सार्वजनिक ठिकाणी काही आरोपी एमडीची खरेदी विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. तर उर्वरित चार आरोपींना पकडण्यात आले.
पोलिसांनी तपासणी केली असता एका आरोपीच्या घरातून ३०.८० लाख रुपये किंमतीची ३०६ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. पोलिसांनी अझरुद्दीन रहिमदिन काझी (३७, गल्ली नंबर १६, महेंद्र नगर), इरफान शब्बीर अहमद (२१, टिमकी,मोमीनपुरा), नदीम खान नसीम खान (२४, शांतीनगर घाट जवळ) व सय्यद सोहेल अली उर्फ शोबू (नवी वस्ती, टेका, शांतीनगर) यांना अटक केली. तर जुबेर अफसर शेख ( शिवडी, मुंबई), सानू सलामुद्दीन काझी (हैदरपुरा कब्रस्तान जवळ, अमरावती), शेख आतिक (शांतीनगर) यांचा शोध सुरू आहे.
आरोपींकडून एमडी पावडर, तीन मोबाईल, एक मोटारसायकल असा ३१.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, मनोज घुरडे, सिद्धार्थ पाटील, , विवेक आढावू, मनोज नेवारे, सुरज भानावत, शैलेश दोबोले, पवन गजभिये, राशीद शेख, रोहित काळे, सहदेव चिखले, सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर , अनुप यादव , विवेक झिंगारे, चंद्रशेखर राघोर्ते, अनंत क्षीरसागर, पराग ढोग यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मुंबईवरून आली होती एमडी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा माल मुंबईवरून आला होता. हे आरोपी अनेक दिवसांपासून एमडी खरेदी विक्रीचे काम करत होते. मुंबईतून ही पावडर कोणी पुरविली याची चौकशी करण्यात येत आहे.