पर्सनल माहिती अन् ओटीपी विचारून दोघांना दीड लाखांना गंडविले!
By विलास जळकोटकर | Published: October 27, 2023 07:11 PM2023-10-27T19:11:49+5:302023-10-27T19:12:19+5:30
या प्रकरणी प्रमोद महादेव डोके (वय- ४८, रा. बी ७८ इंदिरा नगर, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
सोलापूर : ॲक्टिव्ह केलेले कार्ड का वापरत नाही अशी विचारणा करुन दोघांना तुमचे कार्डाला सर्व चार्जेस फ्री करुन देतो असे म्हणून विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवून ओटीपीद्वारे एकाचे ९१ हजार ६७४ रुपये ६० पैसे आणि दुसऱ्याचे ५० हजार ९०० असे १ लाख ५० हजार ८५८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ३१ मे व ८ जून २०२३ या दोन दिवशी विजापूर रोड व टिकेकरवाडी येथे घडला. या प्रकरणी प्रमोद महादेव डोके (वय- ४८, रा. बी ७८ इंदिरा नगर, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की,यातील फिर्यादी हे न्यू इंडिया इन्सुरन्स विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत. त्यांना जानेवारी २०२३ मध्ये बजाज कंपनीकडून डीबीएस सुपर कार्ड व्हिसा असे कार्ड कुरियअरद्वारे मिळाले होते. सदर कार्ड मिळाल्यानंतर फिर्यादीने ते कार्ड ॲक्टिव्ह केले होते मात्र ते कार्ड वापरत नव्हते. ७ जून २०२३ रोजी सायंकाळई ५:४१ वाजता ९०४०९२२४२४ या मोबाईल क्रमांकावरुन एका महिलेने डीबीएस सुपर कार्ड व्हिसामधून बोलतेय तुम्ही या कार्डचा वापर का करीत नाही, अशी विचारणा केली. यावर फिर्यादीने ‘तुमच्या कार्डची वार्षिक फी जास्त आहे’ असे सांगितले यावर ‘आम्ही तुम्हाला कंपनीकडून सर्व चार्जेस फ्री देत आहोत.
तुम्हाला कोणतेही चार्जेस लागणार नाहीत,लाईफटाईम चार्जेस लागणार नाहीत, असे सांगितले. यावर फिर्यादीचा विश्वास बसला. संबंधीत महिलेने कार्डसंबंधी जी माहिती विचारली ती सर्व फिर्यादीने सांगितली. थोड्या वेळाने एक ओटपी आला तोही सांगितला गेला. तेव्हा सदर महिलेने ‘तुमचे कार्ड लाईफटाईम फ्री झाले आहे’ असे सांगून फोन बंद केला. थोड्या वेळाने फिर्यादीला डीबीएस सुपर कार्ड व्हिसा या कंपनीमधून फोन आला की, आपल्या क्रेडिट कार्डमधून मोठे ट्रॉन्झिक्शन झाले आहे. यावर फिर्यादीकडून कोणतेही ट्रॉन्झिक्शन केले नाही असे म्हणाल्यावर कंपनीकडे रितसर तक्रार करण्या सांगण्यात आले. ८ जून २०२३ रोजी पहाटे १२:५० वाजता फिर्यादीच्या मोबाईलवर ९१ हजार ६७४ रुपये ६९ पैसे कट झाल्याचे दोन टेक्स मेसेस आले.या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघचवरे करीत आहेत.
दुसऱ्यालाही ५० हजाराला गंडा
फिर्यादीची जशी फसवणूक झाली तशीच अविनाश नंदकुमार लोंढे (रा. टिकेकरवाडी, ता. उ. सोलापूर) यांचेही बजाज फायनान्सचे डीबीएस सुपर कार्ड व्हिसा क्रेडिट कार्ड लाईफ टाईम फ्री चार्जेस करतो म्हणून ८१७१५१५७६२ या क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने ओटीपी मेसेज मागवून ३१ मे २०२३ रोजी ५० हजार ९०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.