फसवी लिंक पाठवून बँक खाते केले साफ, ३० लाखांचा ऑनलाइन गंडा
By वासुदेव.पागी | Published: September 16, 2023 05:53 PM2023-09-16T17:53:57+5:302023-09-16T17:54:48+5:30
या पत्रामध्ये ‘स्क्रॅच कार्ड’ होते. ‘तुम्हाला दीड लाखाचे बक्षीस लागले आहे.
पणजी: फसवी लिंक पाठवून त्याद्वारे बँक खात्याचा सफाया करणारे सायबर गुन्हेगार पुन्हा सक्रीय झाले आहेत. साळगाव येथील एका गृहस्थाला सायबर गुन्हेगारांनी अशाच पद्धतीने ३०.८७ लाख रुपयांना गंढविले. नाथ उम्रस्कर असे या फसविले गेलेल्या गृहस्थाचे नाव असून त्याला अगोदर पोस्टातून स्क्रॅचकार्ड पाठविण्यात आले. पार्सलवर ह्बल रिसर्च सेंटर प्रा. लिमिटेड, मधुराई, तामिलनाडू असा पत्ता होता. या पत्रामध्ये ‘स्क्रॅच कार्ड’ होते. ‘तुम्हाला दीड लाखाचे बक्षीस लागले आहे. तत्काळ दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधा’, असे त्यात लिहिण्यात आले होते.
उम्रसकर यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर प्रथम त्यांना १० हजार रुपये आगाऊ रक्कम भरण्यास सांगण्यात आले. उम्रसकर यांनी जोखीम पत्करून ती रक्कम संशयितांनी नमूद केलेल्या खात्यात जमा केली. त्यानंतर संशयितांनी उम्रस्कर यांना एका संकेतस्थळाचे लिंक क्लिक करण्यास सांगितले. लिंक क्लिक केल्यावर सायबर गुन्हेगारांना त्याच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळाली आणि त्यांनी हुम्रसकर याचे बँक खाते साफ करताना त्यातील ३०.८७ लाख रुपये हडप केले. उम्रसकर यांनी या प्रकरणात गोवा सायबर क्राईम पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.