सीएला बारबालेने दीड कोटींना लुबाडले, आत्महत्येला कलाटणी, मुलाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:18 AM2021-03-30T02:18:45+5:302021-03-30T02:19:59+5:30
Thane Crime News : वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर खुनीहल्ला करून शोभराज राघनी (५४) या लेखापालाने (सीए) हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. मात्र...
ठाणे - वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर खुनीहल्ला करून शोभराज राघनी (५४) या लेखापालाने (सीए) हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, या बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करून गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली. या प्रकरणाला कलाटणी मिळाल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
कल्याणच्या खडकपाडा, वायलेनगर येथे राहणाऱ्या साहिल शोबराज याने २८ मार्च, २०२१ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात या संदर्भात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आपल्या तक्रारीमध्ये त्याने म्हटले आहे की, ठाण्यातील सावरकरनगर येथील पाटीलवाडी भागात राहणारी मुमताज उर्फ नलिनी शर्मा, तसेच तिच्या अन्य दोन बहिणी पिया आणि कमल (तिघींच्याही नावात बदल केला आहे) यांनी २०१६ ते २३ मार्च, २०२१ या कालावधीमध्ये शोभराज यांना वारंवार ब्लॅकमेल करून त्यांना मानसिक त्रास दिला. या काळात त्यांच्याकडून तब्बल दीड कोटींची रक्कम लुबाडली आहे. या तिघींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून शोभराज यांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली.
काय होता प्रकार
वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर चाकूने खुनीहल्ला करून शोभराज यांनी स्वत:ही बाळकूम येथील रेसिडेन्सी हॉटेलच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणी शोभराज यांच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. (CA was robbed of Rs 1.5 crore by Barbala in thane)
शोभराज यांचे या ३३ वर्षीय बारबालेशी अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून ती पैशांची मागणी करीत होती. यातूनच झालेल्या वादातून त्याने रेसिडेन्सी हॉटेलमधील एका खोलीत तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर, स्वत: खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती.
दरम्यान, खुनाचा प्रयत्न आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे न्यायालयात अबेटेड समरी सादर केली जाणार आहे. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात बारबालेसह तिघींना गरज पडल्यास अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.