नोकरीच्या आमिषाने लुटणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश, दिल्लीतून शिक्षकासह ५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 06:10 AM2020-10-31T06:10:39+5:302020-10-31T06:11:07+5:30
Crime News : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांशी संपर्क साधून नोंदणीसाठी १० रुपये भरण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून लाखो रुपये उकळणाऱ्या दिल्लीतील कॉल सेंटरचा पंतनगर पोलिसांनी पर्दाफाश केला.
मुंबई : नोकरीसंदर्भातील ऑनलाइन संकेतस्थळावर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांशी संपर्क साधून नोंदणीसाठी १० रुपये भरण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून लाखो रुपये उकळणाऱ्या दिल्लीतील कॉल सेंटरचा पंतनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. यात शिक्षकासह पाच आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली.
कॉल सेंटर चालक राहुल तिलकराज (२१), शिक्षक आदित्य करण सिंग (३२), आशिष इक्बाल मोहम्मद हसन (२७), रवी भानुप्रताप होकला (२४) आणि देवेश कुमार वीरपाल सिंह (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
घाटकोपर परिसरात राहणाऱ्या तरुणाला त्यांनी सव्वाआठ लाखांना गंडा घातला हाेता. तरुणाच्या तक्रारीवरुन पंतनगर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या आधारे याचे दिल्ली कनेक्शन समोर आले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकड़ून ८ हार्डडिस्क, २३ मोबाइल, ४७ सिम कार्ड, १२ डेबिट कार्ड, ११ पेटीएम कार्ड, ७ डोंगल ३ सीडी, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना तसेच १२ सिम कार्डचे केस कव्हर असा एकूण १ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक आरोपींकडे अधिक तपास सुरू आहे.