कॉल गर्लच्या हत्येची सुपारी फुटलीच नाही; रेकी करून तीन वेळा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 11:23 PM2021-12-13T23:23:00+5:302021-12-13T23:23:10+5:30
पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
नागपूर - फ्लॅट बळकावून बसलेल्या एका कॉलगर्लची हत्या करण्यासाठी चार लाखांची सुपारी घेणाऱ्या चाैघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. भूपेंद्र मोहन गिल्लोरकर (वय ३२, रा. तुमसर), राहुल संतोष हलमारे (वय ३६, रा. हिवरीनगर), राजेश उर्फ राजा सुरेश गुंड (वय ३५), पूजा राजेश गुंड (वय २५, दोघेही रा.सोमवारी क्वॉर्टर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना सुपारी देणारा गणेश बर्वे नामक आरोपी फरार आहे. ही कॉलगर्ल वाडी भागात राहते.
वेश्याव्यवसाय करण्याच्या आरोपात पोलिसांनी तिच्याविरुद्ध तीन वेळा कारवाई केली आहे. तिने बर्वे याचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. तो रिकामा करून देण्यास तिने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे चिडलेल्या बर्वे याने आरोपी गिल्लोरकर आणि हलमारेच्या माध्यमातून तिची हत्या करण्यासाठी आरोपी राजेश आणि पूजा गुंड यांना चार लाखांची सुपारी दिली होती. ती घराबाहेर पडताच तिला अंधारात गाठून लोखंडी रॉडने तिची हत्या करण्याचा कट आरोपींनी रचला होता. तशी रेकीही आरोपींनी केली होती. मात्र, तिने आरोपींना संधीच दिली नाही. तिला सुपारीची कुणकुण लागताच तिने वाडी ठाण्यात तक्रार नोंदवली.
बोंबाबोंब झाल्याने ती बचावली
सुपारी घेणाऱ्या आरोपींनी बोंबाबोंब केल्याने कर्णोपकर्णी ही माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांना कळली. त्यामुळे सोमवारी
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, एपीआय सुनीत परतेकी, अनिल मेश्राम, पीएसआय मुक्तीराम चेवले, वसंता चाैरे, हवलदार विनोद देशमुख, राजेश कुरसंगे, सुशील श्रीवास, शरद चांभारे, हेमंत लोणारे, सुनील गुजर, सुशांत नंदेश्वर, सुशांत सोळंके, योगेश सेलूकर आणि दिगांबर दहातोंडे यांनी आरोपींच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी सुपारीची रोकड अन् कटाची कबुली दिली असून, मुख्य सूत्रधार गणेश बर्वेचा पोलीस शोध घेत आहेत.