रात्री फोन आला सकाळी मृतदेह दिसला; भादलीतील तरुणाचा खून? शरीरावर जखमा
By सुनील पाटील | Published: August 10, 2022 03:20 PM2022-08-10T15:20:53+5:302022-08-10T15:20:53+5:30
मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता त्याला कोणाचा तरी फोन आला. त्यावेळी तो घरातून बाहेर गेला. रात्री घरी परतलाच नाही.
जळगाव / नशिराबाद : रात्री साडे नऊ वाजता फोन आल्यानंतर घरातून बाहेर गेलेल्या संदेश लिलाधर आढाळे (वय २२, रा.भादली, ता.जळगाव मुळ रा.डोंगरकठोरा, ता.यावल) या तरुणाचा दुसऱ्या दिवशी सकाळी कडगाव शिवारात मृतदेहच आढळून आला आहे. संदेशच्या शरीरावर जखमी असून हा खुनाचाच प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी देखील त्याच दृष्टीने तपासाला गती दिली आहे.
या घटनेसंदर्भात पोलीस व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश आढाळे हाजळगावात एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. संदेशचे वडील खासगी वाहन चालक असून ते नाशिक येथे राहतात. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता त्याला कोणाचा तरी फोन आला. त्यावेळी तो घरातून बाहेर गेला. रात्री घरी परतलाच नाही. बुधवारी सकाळी संदेशचा मृतदेह नशिराबाद पोलीस हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळील शेतात आढळून आला. या घटेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, सहायक फौजदार अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संदेश याच्या पोटावर आणि डोक्यावर घाव असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलवियात आला.
आरपीआयची चौकशीची मागणी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरपीआयचे महानगराध्यक्ष (आठवले गट) अनिल अडकमोल यांनी शासकीय रुग्णालय गाठून मृतदेहाची पाहणी केली. हा घातपाताचाच प्रकार असून रात्री आलेला तो कॉल कोणाचा होता. त्यानंतर पुढे काय झाले याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी अडकमोल यांनी केली आहे. दरम्यान, घटनेचा तपास खुनाच्या दिशेनेच सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी दिली. संदेश याच्या पश्चात वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.