खड्ड्यात पडलेल्या बैलाला वाचवायला गेला; खात्यातूनच 1 लाख रुपये उडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 09:16 AM2020-01-26T09:16:58+5:302020-01-26T09:19:37+5:30
एका बैल मोकळ्या जागेवर खणलेल्या खड्ड्यात पडला होता. त्याला वाचविण्यासाठी खटाटोप केले.
संकटकाळात अडचणीत असताना इंटरनेटवरून फोन नंबर मिळवून मदत मागितली जाते. मात्र, असे करणे धोक्याचे बनले आहे. याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडले आहे. काही दिवसांपूर्वी एक बैल खणलेल्या खड्ड्यात पडला होता. त्याला सोडविण्यासाठी एकाने इंटरनेटवरून रेस्क्यू टीमला फोन केला. मात्र, नंतर त्याला आलेल्या मॅसेजने झोपच उडविली.
वकील पुष्पेंद्र सिंह यांनी एका बैलाला मोकळ्या जागेवर खणलेल्या खड्ड्यात अडकल्याचे पाहिले. यामुळे त्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी इंटरनेटवर शोध घेतला. तेथे त्यांना एक नंबर मिळाला. त्यावर फोन केला असता त्यांना मदत देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि 10 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल असे सांगितले.
बैलाला वाचविण्यासाठी त्यांनी त्यांची माहिती आणि 10 रुपये ऑनलाईन मोबाईलवरूनच भरले. यावेळी त्यांनी तातडीने नगरपालिकेची गाडी येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी गाडी आलीच नाही. उलट त्यांच्या खात्यातून चारवेळा पैसे कापल्याचा मॅसेज आला. एकूण 1 लाख 2 हजार रुपये कापण्यात आले.
पुष्पेंद्र यांचा आरोप आहे की, ही घटना 31 डिसेंबरला घडली. मात्र, पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल 22 दिवस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. यानंतर शेवटी 22 जानेवारीला एसएसपींकडे दाद मागितल्यावर तक्रार दाखल करून घेण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसत आहे की आरोपींनी त्यांना ऑनलाईन लिंक पाठवून मोबाईल फोन हॅक केला आणि त्यांची माहिती चोरून पैसे चोरले.