मांडूळ सापाचे आमिष दाखवून बोलावले, कोल्हापुर जिल्ह्यातील माजी सैनिकाचा बुलडाणा जिल्ह्यात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 11:36 AM2021-11-07T11:36:50+5:302021-11-07T11:38:41+5:30

Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बु. येथील अनिल आनंदा निकम व त्याचा सोबती माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील या दोघांना पवार नामक व्यक्तीने दोन ताेंडी साप देण्याच्या बहाण्याने नांदुरा येथे बोलावले

Called by showing the lure of the sandboa snake, the murder of a former soldier of Kolhapur district in Buldana district, | मांडूळ सापाचे आमिष दाखवून बोलावले, कोल्हापुर जिल्ह्यातील माजी सैनिकाचा बुलडाणा जिल्ह्यात खून

मांडूळ सापाचे आमिष दाखवून बोलावले, कोल्हापुर जिल्ह्यातील माजी सैनिकाचा बुलडाणा जिल्ह्यात खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदुरा (जि. बुलडाणा) : दोन तोंडाचा मांडूळ साप देण्याच्या आमिषाने कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना जबर मारहाण केल्याने त्यातील माजी सैनिक असलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी दुसऱ्यावर नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. आरोपींनी त्याच्याजवळचे एक लाख सहा हजार रुपये लुटले.

विशेष म्हणजे, मृतकासह जखमीला पूर्णा नदीच्या पुलावरून फेकून देण्यात आले होते. त्यांनी मदतीची याचना केल्यानंतर कोणीही मदतीसाठी पुढे आले नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ५ नोव्हेंबर रोजी दुपारनंतर घडलेल्या या घटनेची माहिती रात्री उशिरा नांदुरा पोलिसांना मिळाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बु. येथील अनिल आनंदा निकम व त्याचा सोबती माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील या दोघांना पवार नामक व्यक्तीने दोन ताेंडी साप देण्याच्या बहाण्याने नांदुरा येथे बोलावले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्यासाठी दुचाकी पाठवून त्यांना वडोदा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बाभळीच्या जंगलात नेले. दोघांनी सापाची मागणी करताच त्या दोघांनाही झाडाला उलटे टांगण्यात आले. ओल्या काठीने व लाथाबुक्क्यांनी पाठ, पोटावर बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रल्हाद पाटील (५२, रा. सावर्डे, कोल्हापूर) याचा जागीच मृत्यू झाला.

 

पुलावरून फेकून दिले

मारहाणीपूर्वी पवार टोळीतील पाच-सहा जणांनी त्यांच्या एटीएममधून २१,५०० रुपये, मृतकाच्या नातेवाइकाकडून फोनपेवरून २७ हजार रुपये, ५५ हजार रुपये मागवले. एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. प्रल्हाद व अनिल यांना पुन्हा जबर मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवर बसवून त्यांना पूर्णा नदीच्या पुलावरून फेकून दिले. कोणाला काही सांगितल्यास जखमी निकमला मारून टाकू, अशी धमकी दिली. जखमी अवस्थेत त्याने लोकांना मदत मागितली. त्याला कोणीही मदत केली नाही. एका ॲम्ब्युलन्स चालकाने त्यांना उचलून नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. डॉक्टरांनी तपासणीअंती प्रल्हाद यास मृत घोषित केले. अनिल निकम यांनी पोलिसात तक्रार दिली.

 

सोशल मीडियातून फसवणूक

जळगाव जा, कुऱ्हा, मुक्ताईनगर, वडोदा, लालगोटा या भागात काळी हळद, दोन तोंडी मांडूळ साप, नागमणी पैशांचा पाऊस पाडणारे असल्याची बतावणी केली जाते. तसेच फेसबुकवर पोस्ट पाठवून काही गुंड प्रवृत्तीच्या टोळ्या बाहेर जिल्ह्यातील लोकांना येथे बोलावून अशा प्रकारे लूटमार करतात. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता असे करणाऱ्यांची पोलिसात माहिती द्यावी, असे आवाहन एपीआय गाडेकर यांनी केले आहे.

Web Title: Called by showing the lure of the sandboa snake, the murder of a former soldier of Kolhapur district in Buldana district,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.