तुरुंगातून बाहेर आला, तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आरोपीस अटक
By दयानंद पाईकराव | Published: February 13, 2024 04:41 PM2024-02-13T16:41:23+5:302024-02-13T16:41:32+5:30
राज उर्फ राघवेंद्र राधेशाम यादव (३१, रा. ऐश्वर्या रेसिडेन्सी, वासुदेवनगर हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नागपूर : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणाविरुद्ध तरुणीने गुन्हा दाखल केला होता. परंतु तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच आरोपीने कारने तरुणीच्या मोपेडला धडक देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी १२ फेब्रुवारीला सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
राज उर्फ राघवेंद्र राधेशाम यादव (३१, रा. ऐश्वर्या रेसिडेन्सी, वासुदेवनगर हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया २३ वर्षीय तरुणीची २०२० मध्ये आरोपी राजसोबत इन्स्टाग्रामवर ओळख होऊन त्यांची मेत्री झाली होती. त्यानंतर आरोपीने तरुणीला सोबत नेऊन जबरदस्ती तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले होते. तरुणीच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी आरोपीविरुद्ध ५ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात आरोपी तुरुंगात गेला होता. त्यानंतर १० जानेवारीला तो जमानतीवर बाहेर आला. बाहेर येताच सोमवारी १२ फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी ७.४५ वाजता युवती तिच्या मोपेडने तेलंगखेडी हनुमान मंदिरात गेलेली असताना आरोपी तेथे पोहोचला.
आरोपी तेथे दिसताच तरुणी आपल्या घराकडे निघाली. परंतु गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीव्ही टॉवर चौकाकडून आयबीएम रोडच्या उतारात आरोपी राजने त्याची एक्स. यु. व्ही. ५०० कार क्रमांक एम. एच. ३१, एफ. ए-५२६९ ने पाठलाग करून जीवे मारण्याच्या उद्देशाने तरुणीच्या मोपेडला मागून जोरात धडक दिली. त्यानंतर आरोपी राज तेथून पळून गेला. तरुणी खाली पडल्यामुळे तिच्या हातापायाला, कंबरेला मार लागून ती किरकोळ जखमी झाली. यात तिच्या मोपेडचे नुकसान झाले. नागरिकांनी तिला रस्त्याच्या बाजुला केले. तिने पोलिसांना सुचना दिल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी राज विरुद्ध कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.