उपचारानिमित्ताने आला आणि पळाला; पॉस्को गुन्ह्यातील कैदी घाटी रुग्णालयातून फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 02:08 PM2020-12-05T14:08:19+5:302020-12-05T14:11:05+5:30
न्यायालयाने त्याला जानेवारी महिन्यात ५ वर्ष सक्तमजुरी आणि दंडाचीची शिक्षा ठोठावली होती.
औरंगाबाद: मदतीच्या बहाण्याने मायलेकीवर अतिप्रसंग करण्याच्या आरोपाखाली पाच वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने घाटी रुग्णालयातून आज सकाळी ८:४० वाजता धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
किशोर विलास आव्हाड(२३, रा. राजनगर मुकुंदवाडी) असे फरार झालेल्या कैद्यांचे नाव आहे. मार्च २०१९ मध्ये शहानूरमिया दर्गा येथील आठवडी बाजार आटोपून मायलेकी घरी जाण्यासाठी रात्री ७ वाजता रिक्षाची प्रतिक्षा करीत थांबल्या होत्या. त्यांच्याजवळ केवळ दहा रुपये राहिले होते. यावेळी आरोपीने त्यांना घरी नेऊन सोडण्याची बतावणी करून स्वतःच्या दुचाकीवर बसविले आणि तो त्यांना राजनगर येथील नाल्याकडे घेऊन गेला होता. तेथे मायलेकींवर अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. मात्र असाध्य रोग असल्याचे त्याला खोटे सांगून त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली होती.
याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रध्दा वायदंडे यांनी त्याला अपहरण, विनयभंग आणि पोस्को ( बाल लैंगिक अत्याचार) अशा गुंह्यात अटक केली होती. न्यायालयाने त्याला जानेवारी महिन्यात ५ वर्ष सक्तमजुरी आणि दंडाचीची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये होता. दरम्यान, आजारी असल्याच्या तक्रारी त्याने जेलरकडे केल्यामुळे त्याला ३ रोजी सकाळी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्याजवळ जेलचे पोलीस कर्मचारी तैनात होते. आज सकाळी ८:४० वाजता वॉर्ड क्रमांक १८ मध्ये तो खाटेवर झोपलेला होता. तेव्हा त्याच्यापासून काही अंतरावर जेलरक्षक मोबाईलवर बोलत उभे होते. त्यांची नजर चुकवून त्याने वॉर्डातून धूम ठोकली. ही बाब समजताच एसीपी हनुमंत भापकर, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, सपोनि अजबसिंग जारवाल आणि कर्मचाऱ्यानी घाटीत धाव घेऊन माहिती जाणून घेतली.