पूनम पांडे हिला मिळालेला जामीन रद्द करा; दक्षिण गोवा सत्र न्यायालयात अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 08:14 PM2020-11-09T20:14:08+5:302020-11-09T20:14:56+5:30
Poonam Pandey Case : जामिनीच्या अटींचे उल्लंघन केल्याचाही दावा
मडगाव - सॉफ्ट पॉर्न व्हिडीओ प्रकरणात बॉलिवूड स्टार पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे याना काणकोण न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका या प्रकरणातील तक्रारदार सम्राट भगत यांनी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात दाखल केली आहे.
दरम्यान न्यायालयाने घालून दिलेल्या वेळेत पूनम आणि तिचा पती सॅम काणकोण पोलीस स्थानकावर हजर न राहिल्याने त्यांनी जामीनाच्या अटींचा भंग केल्याचा दावा भगत यांनी करून काणकोण पोलिसांतही निवेदन दिले आहे. भगत यांच्यावतीने ऍड. धर्मेश वेर्णेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. काणकोण न्यायालयाने पूनम व तिच्या पतीला जामीन मंजूर करताना हा व्हिडीओ शूट करण्यासाठी जो मूळ कॅमेरा वापरण्यात आला तो जप्त केला नव्हता याबाबीकडे दुर्लक्ष केले असून अजूनही हा कॅमेरा जप्त केलेला नाही असे म्हटले आहे.
या पॉर्न शूट प्रकरणी काणकोणचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शानुर अवदी यांनी पूनम व तिच्या पतीला प्रत्येकी 20 हजारांच्या जामिनावर मुक्त करताना सहा दिवस सकाळी 10 ते 1 तसेच सायंकाळी 3 ते 6 या वेळेत पोलीस स्थानकावर हजेरी देण्याची अट घातली होती. पण रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेत पूनम व तिचा पती पोलीस स्थानकात हजर नसल्याने काणकोण पोलिसांनी हा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करावा अशी मागणी करणारे निवेदन भगत यांनी काणकोण पोलिसांना दिले आहे.