मुंबईत भरधाव कारने ८ जणांना चिरडलं; ४ जण मृत्यू तर चौघे जखमी, मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 09:49 AM2020-09-01T09:49:25+5:302020-09-01T13:28:58+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रॉफर्ड मार्केट येथील जनता हॉटेलसमोर रात्री ९ वाजता एका वेगवान कारने ८ जणांना धडक दिली.
मुंबई – शहरातील पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वेगवान कारने ८ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून इतर चौघांवर नजीकच्या जे.जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात जनता हॉटेलच्या परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रॉफर्ड मार्केट येथील जनता हॉटेलसमोर रात्री ९ वाजता एका वेगवान कारने ८ जणांना धडक दिली. अतिशय गर्दीच्या व मार्केट परिसरामध्ये कोणतेही वाहन भरधाव वेगाने चालवल्यास पादचारी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही आरोपीने मारुती सुझुकी ईस्टीम या वाहनाने भरधाव वेगात येऊन ८ जणांना धडक दिली. यातील ३ महिला आणि एका पुरुषाचा अपघातात मृत्यू झाला तर इतर ४ जणांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी याबाबत पोलिसांना माहिती देताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळावरुन कारचा चालक फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. यापूर्वीही मुंबईत अशाप्रकारे भरधाव वेगाने येऊन अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा कारचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
मुंबईत यापूर्वी झालेल्या अपघाताच्या घटना
- २८ सप्टेंबर २००२ साली वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळ सलमान खानच्या लँड क्रूजर गाडीने फूटपाथवर झोपलेल्या ५ जणांना चिरडले होते, त्यात एकाचा बळी गेला तर इतर काही जण जखमी झाले. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.
- २०१२ मध्ये पार्टी करुन मित्रांसोबत परतताना दारुच्या नशेत बेफाम गाडी चालवून फुटपाथवरील ७ जणांचा ऍलिस्टर परेरा याने बळी घेतला होता. याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन मुंबई हायकोर्टाने त्याला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर परेराने सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्याठिकाणीही कोर्टाने परेरा याला फटकारत मुंबई हायकोर्टाचा निकालावर शिक्कामोर्तब केले.
- ९ जून २०१५ रोजी कॉर्पोरेट वकील तरुणी जान्हवी गडकर हिने दारूच्या नशेत फ्री वेवर समोरून येणाऱ्या एका टॅक्सीला धडक दिली होती. या अपघातात टॅक्सीचालकासह दोघे जागीच ठार झाले, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी १० जूनला पहाटे जान्हवीला गजाआड केले होते. हा तिचा पहिला अपघात नव्हता. याआधीही तिने अपघात केले होते.