धावत्या मोटारीने घेतला पेट, अग्निशामक दलाच्या तत्परतेने टळला अनर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:23 PM2019-03-06T16:23:36+5:302019-03-06T16:35:54+5:30
चिखली येथील कुदळवाडी परिसरात सेलेस्टा सोसायटीसमोर स्पाइन रोडवर धावत्या मोटारीने अचानक पेट घेतला.
तळवडे : चिखली येथील कुदळवाडी परिसरात सेलेस्टा सोसायटीसमोर स्पाइन रोडवर धावत्या मोटारीने अचानक पेट घेतला. अमोल पाटोळे यांनी अग्निशामक दलाला याची माहिती कळविली, ताबडतोब अग्निशामक दलाचे जवान बंबासह दाखल झाले, तत्परतेने मोटारीची आग विझविली, मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशामक विभागाने दिली आहे.
बुधवार (दि.६) दुपारच्या सुमारास साने चौकाच्या दिशेने मोशी प्राधिकरणकडे निघालेल्या (एमएच.१२ डीएस. ९५८३) या क्रमांकाच्या (फियाट पेलिओ) मोटारीने कुदळवाडी येथील नवीन पुल परिसरातील सेलेस्टा सोसायटीसमोर आली असता मोटारीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतला, मुख्य अग्निशमन केंद्राचा एक बंब आणि चिखली अग्निशमन केंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने मोटारीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली, मोटारीची सी.एन.जी. इंधन टाकी थंड केली, आणखी काही काळ इंधन टाकी थंड केली नसती तर मोठा स्फोट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता होती अशी माहिती अग्निशामक विभागाच्या जवानांनी दिली.
आग विझविण्यात अग्निशामक दलातील दिलीप कांबळे, रुपेश जाधव, गौतम इंगवले, बाळासाहेब वैद्य, सचिन पाटील, लक्ष्मण व्होवाळे, अनिल डिंबळे, विवेक खांदेवाड, या कर्मचाऱ्यांनी महत्वाची भुमिका बजावली.