ड्रगमाफिया ललित पाटीलच्या कार चालकालाही अटक; पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप, तीन दिवसांची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:13 AM2023-10-21T06:13:15+5:302023-10-21T06:13:51+5:30
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी वाघ कर्नाटकातील चन्नासंद्रा गावातील त्याच हॉटेलमध्ये होता, जेथून मंगळवारी रात्री पाटील ललित याला अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा चालक सचिन वाघ (३०) यालाही साकीनाका पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील २ ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून ज्या कारने पळाला, ती वाघ चालवत असल्याचा आरोप आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी वाघ कर्नाटकातील चन्नासंद्रा गावातील त्याच हॉटेलमध्ये होता, जेथून मंगळवारी रात्री पाटील ललित याला अटक करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या छाप्यापूर्वी तो तिथून फरार झाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी विविध राज्य आणि शहरात तो पाटीलला घेऊन फिरत होता. गुरुवारी साकीनाका पोलिसांनी या प्रकरणातील १६ आरोपींना अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २०२० मध्ये कोट्यवधींच्या मेफेड्रोन रॅकेटचा पर्दाफाश केला, ज्यामागे ललित पाटील होता. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना, तो रुग्णालयातून पळून गेला. ललित प्रथम चाळीसगाव, तिथून धुळे आणि नंतर गुजरातमधील सुरत येथे गेला. तेथे काही नातेवाइकांना भेटल्यानंतर, त्यांनी सुरत-सोलापूर-विजापूर मार्गे कर्नाटक गाठण्यासाठी त्यांची मदत घेतली. विजापूरहून तो बंगळुरू शहर आणि बंगळुरू ग्रामीणमधील चन्नासंद्र या गावात गेला. दोन आठवडे पाटीलचा शोध घेत असताना, पोलिस त्याच्या जवळच्या नातेवाइकांवर लक्ष ठेवून होते. पाटीलने त्याच्या सुरतमधील नातेवाइकाशी संपर्क साधून भेट घेतल्याचे समजले. अखेर कर्नाटकातील चन्नासंद्रा येथील एका हॉटेलमध्ये पाटील याला अटक करण्यात यश आले. या सर्व काळात वाघ हा पाटील याच्यासोबत होता, असे सूत्राचे म्हणणे आहे.
आतापर्यंतची कारवाई
या महिन्याच्या सुरुवातीला साकीनाका पोलिसांनी सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि परिमंडळ १०चे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या देखरेखीखाली एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यावर छापा टाकला. या महिन्याच्या सुरुवातीला नाशिकमध्ये ३०० कोटी रुपयांचे एकूण १५० किलो एमडीही जप्त केले. सदर कारखाना ललितचा भाऊ भूषण पाटीलच्या मालकीचा असल्याचे समजले. त्यानुसार, त्यालाही अटक करण्यात आली.