कार शोरूम चालकाची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
By नामदेव मोरे | Published: August 25, 2022 05:57 PM2022-08-25T17:57:59+5:302022-08-25T17:59:51+5:30
खारघरमधील हुंडाई शोरूममध्येही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या कालावधीमध्ये गुजरातमधील विवेक दवे नावाच्या व्यक्तीने कंपनीशी संपर्क साधून ग्राहक मिळवून दिले होते.
नवी मुंबई - खारघरमधील कमल हुंडाई शोरूम व्यवस्थापनाची ८६ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीमधील माजी महाव्यवस्थापकासह एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या काळात वाहन उद्योगामध्येही मंदीचे वातावरण निर्माण झाले होते. खारघरमधील हुंडाई शोरूममध्येही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या कालावधीमध्ये गुजरातमधील विवेक दवे नावाच्या व्यक्तीने कंपनीशी संपर्क साधून ग्राहक मिळवून दिले होते. तो कागदपत्रे व पैसे जमा करण्याचे काम करत होता. त्याने जवळपास १५ कारचा व्यवहार केल्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला होता. कंपनीमधील महाव्यवस्थापकासोबत तो व्यवहार करत होता.
महाव्यवस्थापकाने व्यवस्थापनाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन ग्राहकांकडून पैसे घेतले व त्यांना कार न देता ती इतर ग्राहकांना दिल्याचा प्रकार निदर्शनास आला. दवे व शोरूममधील व्यवस्थापकाने इतर साथीदारांच्या मदतीने २०२० ते २०२२ दरम्यान दोन वर्षामध्ये विविध ग्राहकांकडून जवळपास ८६ लाख ८० हजार रुपये घेऊन त्यांना प्रत्यक्षात कार न देता कंपनीची व ग्राहकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शोरूम व्यवस्थापनाने खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी १२ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.