‘गाडी चुराने का तरीका’ आला अंगाशी : मोटारी चोरणारा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 22:03 IST2018-08-08T21:57:42+5:302018-08-08T22:03:17+5:30
त्याने चोरलेल्या गाड्या स्वत : फिरण्यासाठी वापरल्या. तर आलिशान मोटारीचा वापर त्याने हडपसर सोलापूर वाहतुकीसाठी केला.

‘गाडी चुराने का तरीका’ आला अंगाशी : मोटारी चोरणारा जेरबंद
पुणे : यु ट्युबवरील गाडी चोरण्याचा व्हिडिओ पाहून कोल्हापूर येथून आलिशान मोटारी चोरणाऱ्याला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड उत्तर विभागाने पकडले आहे़ त्याच्याकडून ३ मोटारी व ५ मोबाईल जप्त करण्यात आले़ रेवण सोनटक्के (वय २०, रा़ महंमदवाडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा स्कॉड उत्तर विभागाचे पोलिस निरीक्षक अंजूम बागवान व त्यांचे पथकातील कर्मचारी बुधवारी खडकी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना मुळा रोड येथे रस्त्याच्या कडेला एक आलिशान मोटार संशयास्पदरित्या उभी असल्याचे आढळले. त्यावेळी गाडीत बसलेल्या व्यक्तीकडे चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला़ त्यामुळे त्याच्याकडे मोटारीची चौकशी केल्यावर ती चोरीची असल्याचे आढळून आले़ अधिक चौकशीत त्याने ही मोटार ही गाडी कोल्हापूर येथील गॅरेजमधून चोरली असल्याचे सांगितले. त्यानंतर अशा प्रकारे त्याने कोल्हापूर व सांगलीतून २ मोटारी चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून तीन चारचाकी व ५ मोबाईल जप्त केले.
सोनटक्के याला विचारले असता त्याने कबूल केले की, युट्यूबवर गाडी चुराने का तरीकाच्या व्हिडिओ क्लीप पाहिली होती़ त्यात दाखविल्या प्रमाणे तो चोऱ्या करीत होता़ गाड्या गॅरेजमध्ये दिल्यानंतर मेकॅनिक गाडीची चावी गॅरेजमध्ये किबोर्डवर ठेवत होता. त्यावेळी तेथे गाडी दुरुस्तीच्या बहाण्याने जाऊन चावी चोरायचा. त्यानंतर नंतर रात्री त्या चावीच्या मदतीने गाडी चोरून निघून जायचा. त्याने चोरलेल्या गाड्या स्वत : फिरण्यासाठी वापरल्या. तर आलिशान मोटारीचा वापर त्याने हडपसर सोलापूर वाहतुकीसाठी केला. अशाच अलिशान मोटारीचा नगर रोडवर शिरुरजवळ अपघात झाल्याने सोडून दिली होती. तर त्याने यापूर्वी शिवाजीनगर व बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी केली होती. त्याला आॅगस्ट २०१७ मध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती़ ही कारवाई पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर व इतर कर्मचारी यांच्या पथकाने केली.