निष्काळजीपणे रिव्हॉल्व्हर वापरणं पडलं महागात, कारावासाची शिक्षा
By सागर दुबे | Published: March 6, 2023 09:44 PM2023-03-06T21:44:08+5:302023-03-06T21:44:21+5:30
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाला दोन वर्ष सश्रम कारावास
सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: स्वत:च्या ताब्यातील रिव्हॉल्व्हर निष्काळजीपणे वापरल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल श्रावण मोहकर (६५, रा. पिंप्री, ता. धरणगाव) यांना सोमवारी न्यायालयाने २ वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर मुलगा दीपक मोहकर याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांनी दिला आहे.
११ मे २०१९ रोजी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांच्या वडीलांचे पिंप्री येथे निधन झाले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असताना विठ्ठल मोहकर यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून दोन राउंड आकाशाकडे फायर केले होते. नंतर मुलगा दीपक याने त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर घेवून फायर करण्याचा प्रयत्न केला. गोळी अंत्ययात्रेतील जमलेल्या गर्दीमधील तुकाराम वना बडगुजर (६५, रा. पिंपळगाव हरेश्वर ) यांच्या छातील लागून ते मयत झाले होते. याप्रकरणी विठ्ठल मोहकर व त्यांचा मुलगा दीपक मोहकर यांच्याविरूध्द धरणगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१४ साक्षीदार तपासले, ९ जण फितूर...
हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या न्यायालयासमोर चालला. त्यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये तलाठी अलताफ पठाण, तपास अधिकारी अंबादास मोरे, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, घटनेतील दाखल अंमलदार आनंदा शिंदे, एल.एच.गायकवाड यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. इतर ९ साक्षीदार फितूर झाले होते. न्यायालयाने साक्षीपुराव्याअंती भादंवि कलम ३०४ अ व भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम ३० नुसार विठ्ठल मोहकर यांना दोषी धरून शिक्षा सुनावली. तर त्यांचा मुलगा दीपक याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
अशी सुनावली शिक्षा
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांना भादंवि कलम ३०४ अ नुसार २ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रूपयांचा दंड तर भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम ३० नुसार ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हर्षवधन सपकाळे यांचे तर केसवॉच म्हणून विलास पाटील यांचे सहकार्य लाभले.