कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगला दणका; ११५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 06:21 AM2022-07-31T06:21:21+5:302022-07-31T06:21:32+5:30
कंपनीने कर्जापोटी प्राप्त झालेली रक्कम बंद पडलेल्या काही बिगर बँकिंग वित्तीय सेवा कंपन्यांच्या मार्फत कंपनीच्या मालकीच्या दोन अन्य कंपन्यांत वळवली. या दोन्ही कंपन्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील विविध शेअर बाजारांत शेअर व्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेल्या कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी ईडीने दणका देत ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शनिवारी ईडीने केलेल्या या जप्तीमध्ये इमारती, भूखंड, काही कंपन्यांतील समभागांची गुंतवणूक, रोख रक्कम, परदेशी चलन, दागिने यांचा समावेश आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या ग्राहकांचे समभाग तारण ठेवत बँकाकडून २८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, सेबीने ग्राहकांचे समभाग तारण ठेवण्यास बंदी केल्यानंतर, कंपनीने घेतलेले २८०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत झाले. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हैदराबाद पोलिसांकडे दाखल तक्रारीच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असता कंपनीने अनेक गुंतागुंतीचे व्यवहार केल्याचे दिसून आले.
कंपनीने कर्जापोटी प्राप्त झालेली रक्कम बंद पडलेल्या काही बिगर बँकिंग वित्तीय सेवा कंपन्यांच्या मार्फत कंपनीच्या मालकीच्या दोन अन्य कंपन्यांत वळवली. या दोन्ही कंपन्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच हे पैसे या दोन कंपन्यांत वळविल्यानंतर या कंपन्यांवर असलेल्या कर्जाची परतफेड या पैशांच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच, कंपनीचे अध्यक्ष सी. पार्थसारथी यांनी या दोन कंपन्यांमधून आपल्या दोन्ही मुलांची नेमणूक दाखवत त्यांना पगार तसेच घरगुती खर्चासाठी भत्त्यापोटी पैसे देण्यासही सुरुवात केली. या प्रकरणी बँकेकडून घेतलेल्या मूळ कर्जाची परतफेड न करता ते अवैधरीत्या अन्य उद्योगांत वळवत या पैशांचा वैयक्तिक लाभासाठी वापर केल्याचा ठपका ठेवत ईडीने कंपनीवर आणि कंपनीच्या अध्यक्षांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कंपनीचे अध्यक्ष सी. पार्थसारथी यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मात्र, तपासादरम्यान त्यांच्याकडील अन्य मालमत्तेचा तपशील प्राप्त झाल्यानंतर ईडीने शनिवारी त्यांची ११० कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी ईडीने यापूर्वी कंपनीची १९८४ कोटी ८४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शनिवारी केलेल्या कारवाईनंतर कंपनीची आतापर्यंत एकूण २०९५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झालेली आहे.
अन्य दोन प्रकरणांत ५ कोटींची जप्ती
ईडीने अन्य दोन प्रकरणांत केलेल्या कारवाईद्वारे ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
यापैकी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीत सरव्यवस्थापक असलेल्या बाभेन मैत्रा या व्यक्तीने बनावट कागदपत्रांचा वापर करून सुमारे १८ कोटी ७५ लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी कंपनीने त्याची २ कोटी ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
तर, पतपेढीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी ओडीशामधील माजी आमदार प्रवत रंजन बिस्वल याची ३ कोटी
९२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.