माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याविरुद्ध गुन्हा, मुख्य निवडणूक आयुक्तांचा गळा घोटण्याचा इशारा भोवला
By संदीप वानखेडे | Published: May 25, 2024 07:29 PM2024-05-25T19:29:34+5:302024-05-25T19:29:45+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलिस ठाण्यात सावजी यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अमरनाथ नागरे यांनी सांगितले.
डोणगाव : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक जागांवर महाविकास आघाडीला कौल आहे. ईव्हीएममध्ये घोळ केला तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा गळा घोटण्याचा इशारा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पत्राद्वारे दिला होता. सावजी यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती डोणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अमरनाथ नागरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
येत्या ४ जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्यात ४८ लोकसभेच्या जागांपैकी ३५ ते ४० जागा या महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा दावा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी नुकताच केला होता. हा दावा करीत असताना सावजी यांनी देशातील सध्याचे सरकार हे ईव्हीएम मशीन घोटाळा करून महायुती सरकार आणण्याच्या तयारीत असल्याची शंका मतदारांमध्ये असल्याचे म्हटले होते. त्यांनी याबाबत निवडणूक आयुक्तांना पत्र पाठविले आहे.
त्यात जर ईव्हीएम मशीन घोटाळा झाला तर मी तुमचा गळा घोटेल, असा इशाराच दिला होता. दरम्यान, सावजी यांच्या पत्राची आणि त्यांच्या माध्यमातील वक्तव्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलिस ठाण्यात सावजी यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अमरनाथ नागरे यांनी सांगितले.