पेपरफुटी प्रकरणी आसाम रायफलच्या जवानास अटक, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:00 AM2018-11-05T06:00:19+5:302018-11-05T06:00:33+5:30
लष्कर भरतीचा पेपर फोडणाऱ्या टोळीतील धाकलू पाटील (रा. कर्नाटक) या आसाम रायफलच्या जवानाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने नुकतीच अटक केली आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - लष्कर भरतीचा पेपर फोडणाऱ्या टोळीतील धाकलू पाटील (रा. कर्नाटक) या आसाम रायफलच्या जवानाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने नुकतीच अटक केली आहे. त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांपैकी तो सोळावा, तर लष्करातील चौथा आरोपी ठरला आहे.
दीड वर्षापूर्वी नागपूर, पुणे आणि गोवा येथे लष्कर भरती परीक्षेचा पेपर फुटला होता. या प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि रवींद्र दौंडकर यांच्या वेगवेगळ्या पथकांनी लष्करातील तीन कर्मचाºयांसह १५ जणांना अटक केली होती. सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या अधिपत्याखालील पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.
आसाम रायफलमध्ये हवालदार असलेल्या धाकलू याचेही नाव या प्रकरणात समोर आले होते. तो आसाम रायफलच्या नागालॅण्ड येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये असल्याचे उघड झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक माने यांच्या पथकाने नागालॅण्ड येथून ३० आॅक्टोबर रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. तेथील स्थानिक न्यायालयाने त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत ट्रान्झिट कस्टडी दिली. ठाणे न्यायालयाने शनिवारी त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
धाकलूविरुद्ध वॉरंट
धाकलू हा गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यामुळे ठाणे सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. तो आसाम रायफलच्या प्रशिक्षण केंद्रात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अखेर ठाणे पोलिसांनी अटक केली.
काय होते पेपरफुटीचे प्रकरण?
लष्कर भरतीसाठी २६ फेब्रुवारी २०१७ रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेपूर्वीच म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी नागपूर, पुणे आणि गोवा या परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटला होता. ज्यांनी हे पेपर आधीच खरेदी केले, त्या उमेदवारांना या तिन्ही केंद्रांवरील एका हॉलमध्ये बोलवून परीक्षेतील प्रश्न सांगितले जात होते. हे प्रश्न त्यांच्याकडून लिहून घेतले जात असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाºयांनी या तिन्ही ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकून हा पेपर घोटाळा उघड केला होता.