गौतमी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल; आयोजकाकडून फसवणूक झाल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 04:00 PM2023-05-15T16:00:39+5:302023-05-15T16:02:48+5:30
बार्शी महोत्सवात कार्यक्रम करताना परवानगी न घेता गर्दी जमवून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आयोजकावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता
सोलापूर - नृत्यांगना गौतमी पाटील आणि वाद किंवा गोंधळ हे आता नवीन राहिलं नाही. गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटील माध्यमांत आणि सोशल मीडियात चांगलीच चर्चेत आहे. गौतमीचं जिथं जिथं शो असतो, तिथं काहीतरी नवा वाद किंवा चर्चेतली घटना घडते. दोन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी इथं गौतमीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आता, या कार्यक्रमाच्या आयोजकांची फसवणूक केल्याप्रकरणी गौतमी पाटीलविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच यासंदर्भात बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बार्शी महोत्सवात कार्यक्रम करताना परवानगी न घेता गर्दी जमवून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आयोजकावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बार्शी येथे येथे शुक्रवार, दि. १२ मे रोजी झाला. विनापरवाना कार्यक्रम घेतल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाडकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आयोजक प्रजाशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र भगवान गायकवाड (रा.बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमादिवशीही पोलिसांनी आयोजकाला गौतमीचा शो बंद करायला लावला होता. त्यामुळे, कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांची नाराजी झाली, केवळ एकाच गाण्यावर गौतमीने डान्स केला होता. आता, गौतमीकडूनच आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत आयोजकानेच फिर्याद दिली आहे.
गौतमी पाटील कार्यक्रमासाठी ठरवून दिलेल्या वेळेत पोहोचली नाही. गौतमी वेळेत न आल्यामुळे रात्री उशीर झाल्यामुळे कार्यक्रम लवकरच बंद करण्यात आला. त्यामुळे, कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरुन आलेल्या प्रेक्षकांची मोठी निराशा झाली. तर, आयोजकांचीही नाचक्की झाली. त्यामुळे, आयोजकाने गौतमी पाटील हिच्याकडूनच आपली फसवणूक झाल्याचे सांगत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, गौतमी पाटीलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल
शहरातील कुर्डुवाडी रोडवरील जैनमंदिराजवळील शेटे मळा येथे १२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांनी शहर पोलिसांत या लावणी महोत्सवास सशुल्क पोलिस बंदोबस्त मिळण्यास अर्ज केलेला होता. पोलिसांनी या कार्यक्रमासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, महावितरण कार्यालयाचे वीजपुरवठा मंजुरीचे प्रमाणपत्र, पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कर्मचारी नियुक्ती प्रमाणपत्र, अग्निशामक यंत्रणेचे व अॅम्ब्युलन्स व वैद्यकीय सुविधा प्रमाणपत्र, या सर्व बाबींची पूर्तता केल्यास व पोलिस बंदोबस्त यांचे शुल्क भरल्यानंतर पोलिस बंदोबस्त देण्यात येईल, असे त्यांना पत्राद्वारे पोलिसांनी कळविले होते. परंतु यातील कोणतीच पूर्तता न करता तसेच कोणतीही परवानगी न घेता त्यांनी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.