५० लाख रुपयांची खंडणी मागण्याऱ्या विरोधात गुन्हा दाखल; ACB कर्मचाऱ्याला धमकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 03:41 PM2021-10-23T15:41:02+5:302021-10-23T15:41:38+5:30
लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगडःअलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात घुसून पोलिस हवालदाराला धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय पिंपळभाट येथे आहे. १७ सप्टेंबर २१ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आरोपीने काहीही काम नसताना प्रवेश करीत संबंधीत पोलिस फिर्यादी यांना मला तुझी नोकरी घालवायची आहे. तुझी सगळी माहिती मी काढली आहे. जमिनीच्या व्यवहारामध्ये एक कोटी रुपये घेतले आहेस. त्यातील मला ५० लाख दे नाही तर तुझी चौकशी करायला लावून कारवाई करायला सांगतो. त्यावर फिर्यादी यांनी मी काय म्हणून पैसे देऊ, मी कोणाकडूनही एवढी मोठी रक्कम घेतलेली नाही. मी एकही पैसा देणार नाही असे सांगितले. याचा राग येऊन आरोपी हा फिर्यादीच्या अंगावर मारण्यासाठी गेला. त्यावेळी तिथे असलेल्या पोलिस कर्मचारी सहकार्याने हस्तक्षेप करुन प्रकरण सोडवले. त्यानंतर शिवीगाळ आणि धमकी देत आरोपी रिक्षातून निघून गेला.
या आधीही आरोपी हा २० मे २१ रोजी फिर्यादीच्या घरी गेला होता. फिर्यादी तेथे हजर नसताना त्यांच्या घरी जात त्यांच्या पत्नी आणि मुलाला धमकावत तुझ्या वडिलांना ५० लाख रुपये द्यायला सांग नाही तर ऑफिसमध्ये जाऊन बदनामी करुन नोकरी घालवून वाट लावेन अशी धमकी दिली. त्या दरम्यान फिर्यादी घरी आले असता त्यांच्यासोबत आरडाओरड करीत बिनशेती प्रकरणात तु घेतलेल्या एक कोटीपैकी ५० लाख रुपये मागितली. त्यावर माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तुम्ही बिनशेतीचे ज्यांचे काम केले आहे, त्यांच्याकडूनच पैसे घ्या असे सांगितले. आणि माझ्याकडे एवढी मोठी रक्कम नाही. यापुढे तुम्ही माझ्या घरी पैसे मागायला येऊ नका नाहीत तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन असे सांगितले हाेते. सातत्याने असे प्रकार होत असल्याने फिर्यादीने गुरवारी २१ ऑक्टोबर २१ रोजी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.