‘ए आर हॉलिडेज’कडून गुंतवणूकदारांची फसणवूक, गुन्हा दाखल; हॉटेल्स पुरविण्याचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 08:42 AM2023-09-02T08:42:15+5:302023-09-02T08:42:35+5:30
कंपनीने २०२२ साली अहमदनगरमध्ये सेमिनार घेतले. या सेमिनारमध्ये नागरिक उपस्थित राहिले, तर त्यांना एका सहलीसाठी मोफत हॉटेल्स दिले जाईल, असे आमिष दाखविले गेले.
अहमदनगर : आमच्याकडे पैशाची गुंतवणूक केल्यास पुढील पाच वर्षे देश, विदेशात सहलीसाठी तुम्हाला चांगल्या दर्जाचे हॉटेल पुरविले जातील, असे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे घेतले व त्याप्रमाणे सुविधा न देता फसवणूक केली, म्हणून वसई येथील ए आर हॉलिडेज या कंपनीविरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सुजाता लंके, अंजली देशमुख व राजेंद्र घोडके यांनी कोतवाली पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. कंपनीने २०२२ साली अहमदनगरमध्ये सेमिनार घेतले. या सेमिनारमध्ये नागरिक उपस्थित राहिले, तर त्यांना एका सहलीसाठी मोफत हॉटेल्स दिले जाईल, असे आमिष दाखविले गेले. आमच्या कंपनीत पुढील पाच वर्षांसाठी दीड लाख रुपये गुंतविल्यास आम्ही दरवर्षी तुम्हाला सहा रात्र व सात दिवसांसाठी देशात व आशियाई राष्ट्रात हॉटेल्स उपलब्ध करुन देऊ, असे आमिष नंतर सेमिनारमध्ये दाखविले गेले. त्याप्रमाणे सेमिनारच्या दिवशीच पैसे भरून घेतले.
कंपनीच्या वतीने सरफराज, स्वप्नील साळे यांनी सेमिनारमध्ये सादरीकरण केले. मात्र, त्यांनीही गुंतवणूकदारांना नंतर काहीही मदत केली नाही. त्यांनी कंपनीचे मालक अमित राणा, वृंदा, सुवर्णा भोगल या कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितला. मात्र, त्यांनीही काहीही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. आम्ही पैसे परत करू, असा लेखी मेल कंपनीने काही गुंतवणूकदारांना दिला. मात्र, त्यानंतरही पैसे परत केले नाहीत. या कंपनीचे कार्यकारी संचालक अमित राणा, सरफराज, स्वप्नील साळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.