पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल, नितीन गडकरींचा भाऊ असल्याची केली बतावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:14 AM2021-06-08T06:14:11+5:302021-06-08T06:14:35+5:30
Crime News : अमोल पळसमकर यांनी ही तक्रार दिली. अमोल हे एका बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील नेमाडे गल्ली सुमित्र कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राजन गडकरी यांच्याशी त्यांची ज्योतिष पाहण्याच्या निमित्ताने जून २०१९ मध्ये ओळख झाली.
डोंबिवली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे भाऊ आहेत. आयकर विभाग जे सोने जप्त करतो ते कमी किमतीत ओळखीने मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, अशी बतावणी करीत एकाला पाच लाखांचा गंडा घातल्याच्या तक्रारीवरून राजन गडकरी आणि आनंद गडकरी या बाप-लेकाविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
अमोल पळसमकर यांनी ही तक्रार दिली. अमोल हे एका बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील नेमाडे गल्ली सुमित्र कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राजन गडकरी यांच्याशी त्यांची ज्योतिष पाहण्याच्या निमित्ताने जून २०१९ मध्ये ओळख झाली. पुढे ७ फेब्रुवारी २०२० रोजी अमोल हे गडकरी यांच्या घरी गेले असता राजन आणि त्यांचा मुलगा आनंदने त्यांना आमचे डोंबिवली स्टेशनला सोन्याचे दुकान आहे. माझे भाऊ नितीन गडकरी हे केंद्रात मंत्री आहेत.
आयकर विभाग जे सोने जप्त करतात ते कमी किमतीत तुम्हाला ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, असे गडकरी पिता-पुत्रांनी पळसमकर यांना सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून पाच लाखांचा चेक दोघांना सुपूर्द केला. एक ते दोन महिन्यांत तुम्हाला तुमचे सोने मिळून जाईल, असे राजन यांनी सांगितले; परंतु दोन महिने उलटूनही सोने मिळाले नाही. गडकरी यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर लॉकडाऊन लागल्याने अमोल गावी निघून गेले. २५ मे रोजी ते पुन्हा पैसे मागण्यासाठी गडकरी यांच्या घरी गेले असता त्यांचे कुटुंब घर सोडून गेल्याची माहिती शेजाऱ्यांकडून अमोल यांना मिळाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमोल यांनी विष्णूनगर पोलीस ठाणे गाठत गडकरी पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली. या दोघांनी काही जणांना नोकरीचे आमिष दाखवीत फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
गडकरी कुटुंब बेपत्ता, सुनेची पोलीसात तक्रार
- राजन, त्यांची पत्नी अलका, मुलगा आनंद आणि नातू रुग्वेद, असे २४ मेपासून बेपत्ता झाल्याची तक्रार सून गीतांजली गडकरी यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
- लहान मुलाला दवाखान्यात डोस देण्यास घेऊन जातो असे सांगून घराबाहेर पडले ते आजतागायत आले नसल्याचे गीतांजली यांनी तक्रारीत म्हटले आहे.