हनुमान व दत्त मंदिराच्या पुजारी कुटुंबियांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 10:00 AM2021-10-07T10:00:23+5:302021-10-07T10:00:48+5:30
पोलीस आयुक्त सदानंद दाते व उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोड पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या नवघर गावातील हनुमान मंदिर व दत्त मंदिरचे पुजारी कुटुंबियांची जमीन प्रकरणात फसवणूक करून ती बळकावल्या प्रकरणी भाजपाचे वादग्रस्त माजी आमदार नरेंद्र मेहतांसह माजी महापौरांचे पती विनोद मेहता तिवारी इंजियरिंग कॉलेजचे राहुल व लल्लन तिवारी आदींवर बुधवारी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदरच्या नवघर गावातील दत्त मंदिरचे सच्चिदानंद पावसकर हे पुजारी होते. त्यांची व कुटुंबियांची सामायिक मालकीची जमीन ही मीरारोडच्या कनकिया भागात मौजे नवघर सर्वे क्र. ५२/१ ही सुमारे १ हेक्टर ११ गुंठे इतकी आहे. २००५ साली त्यावेळी नगरसेवक असताना नरेंद्र मेहता यांनी सदर जमीन खरेदी साठी श्यामभाई ह्या दलाला मार्फ़त पावसकर कुटुंबियांचे घर गाठले. १ कोटी रुपयांचा मोबदला सांगितला असता मेहतानी धमकावून केवळ ६० लाख देणार सांगत अनोंदणीकृत विक्री करार व कुलमुखत्यार आदी कागदांवर सह्या घेतल्या. परंतु मेहतानी पावसकर कुटुंबियांना केवळ १५ लाख रुपयेच दिले. त्यामुळे पावसकर कुटुंबीयांनी अनोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र आदी रद्द केल्याची नोटीस देत वृत्तपत्रात तशी प्रसिद्धी केली.
दुसरीकडे मेहतानी अनोंदणीकृत कुलमुखत्यार पत्रचा गैरवापर करत पावसकर यांच्या जमिनीचा एक भाग हा लल्लन तिवारी व राहुल तिवारी यांना दीड कोटींना विकली. तर जमीनचा एक भाग मेहतानी सेव्हन इलेव्हन हॉटेल्सला भाऊ विनोद मेहता द्वारे हस्तांतरित केला. तर काही जमिनीचा पालिकेकडून टीडीआर घेतला. फिर्यादी ज्योत्स्ना पावसकर यांच्या आई वेणूबाई यांचे निधन झाले असताना देखील जमिनीची परस्पर विक्री, बनावट अंगठा लावून फेरफार आदी प्रकार केले. मेहतानी यूएलसी च्या जमीन क्षेत्राची विक्री तिवारी ना केली. मेहता व तिवारी यांनी संगनमताने हे केले. एका भागात तिवारी यांनी तिवारी इंजिनिअरिंग कॉलेज बांधले आहे.
फिर्यादी वरून मीरारोड पोलिसांनी नरेंद्र मेहतांसह विनोद मेहता, राहुल तिवारी, लल्लन तिवारी, तत्कालीन तलाठी विजय पवार, कमलेश अंबानी, सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन व सेव्हन इलेव्हन हॉटेल्स, राहुल एज्युकेशन व राहुल ग्रुप निर्माण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते व उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोड पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.