रहाटणी येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 12:09 PM2018-12-15T12:09:29+5:302018-12-15T12:13:34+5:30
ओळखीच्या दोघांनी आईच्या चारित्र्यावरून अपशब्द बोलल्याचे सहन न झाल्याने तरूणाने गळफास घेऊन १० डिसेंबर रोजी आत्महत्या केली.
पिंपरी-चिंचवड : ओळखीच्या दोघांनी आईच्या चारित्र्यावरून अपशब्द बोलल्याचे सहन न झाल्याने तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बळीराज कॉलनी रहाटणी येथे घडला. याप्रकरणी वाकड ठाण्यात दोघां सख्या भावावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव गजानन काळे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई अर्चना काळे (वय ३७, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी, मूळगाव चिखली, बुलढाणा) यांनी वाकड ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे (रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वाकड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महिला आपल्या दोन मुलांसह येथे तीन वर्षांपासून भाड्याने राहत असल्याने संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे हे दोघे मयत वैभव काळे याच्या ओळखीचे आहेत. ह्या आरोपींनी वैभवच्या आईची एकदा छेड काढली होती. याचा जाब विचारण्यास गेलेल्या वैभवला देखील त्यांनी आईच्या चारित्र्यावरून अपशब्द बोलत शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. हे सर्व सहन न झालेल्या वैभवने १० डिसेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.