अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल
By धीरज परब | Updated: January 29, 2025 22:44 IST2025-01-29T22:43:00+5:302025-01-29T22:44:08+5:30
फसवणाऱ्या एका बोगस कॉल सेंटर प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे .

अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेवार्क, मीरारोड - अमेरिकेतील अमेझॉनच्या ग्राहकांना गुगल वर बनावट कस्टमर केअर क्रमांक टाकून त्याद्वारे फसवणाऱ्या एका बोगस कॉल सेंटर प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे .
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय सरक व पथकाने ने मीरारोडच्या हाटकेश मधील सॅटेलाईट पार्कच्या एका बंगल्यातून चालणारे हे बोगस कॉल सेंटर उघडकीस आणले आहे . पोलिसांनी येथून ५ मोबाईल, ४ लॅपटॉप आदी जप्त केले आहे.
ह्या बोगस कॉल सेंटरचे मुख्य सूत्रधार शाहरुख अब्दुल शेख ( वय ३० वर्ष ) व इम्रान खान ( वय २७ वर्ष ) हे असून त्यांच्यासह सदर कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या इर्शाद शेख ( वय ३७ वर्ष ), तानीया पाठक उर्फ सोफिया ( वय २२ वर्षे ), पुनीत चौहान ( वय ३३ वर्ष ), कॅरीटा मथायस ( वय २९ ) व ऐश्वर्या पेडणेकर (वय २३ वर्ष ) अश्या ७ जणांवर काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
गुगल वर अमेझॉन कॉल सेंटरचे बनावट ग्राहक सेवा क्रमांक टाकले होते . अमेरिकेतील अमेझॉनचे ग्राहक वस्तू मिळाली नाही वा अन्य कारणासाठी गुगल वर ग्राहक सेवा क्रमांक सर्च केल्यास सदर बनावट क्रमांक वर कॉल करायचे . अमेरिकन ग्राहकाचा कॉल आला कि , तुमचे अकाउंट हॅक झाले आहे वा तुमच्या खात्यावर दंड लागला असे बोगस कॉल सेंटर मधून सांगितले जायचे .
डॉलर भरून खाते नियमित करण्यासाठी त्यांना बँक संबंधित कॉल जोडून देत सांगत ओटीपी घ्यायचे. ग्राहकाच्या व्यवहाराची माहिती काढून घेत ग्राहकांना गिफ्ट व्हाउचर साठी पैसे भरायला लावून नंतर ते व्हाउचरचे पैश्यात रूपांतर करून ते स्वतः लाटायचे . आता पर्यंत आरोपींनी कितीजणांना गंडवले आहे , फसवणुकीची नेमकी रक्कम किती आदी प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत .