मीरारोड: भाजपच्या माजी युवाध्यक्षासह साथीदारांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमके प्रकरण
By धीरज परब | Published: September 3, 2022 06:09 PM2022-09-03T18:09:14+5:302022-09-03T18:09:58+5:30
भाजपच्या माजी युवा जिल्हाध्यक्ष निलेश सोनी सह त्याच्या २४ ते २९ साथीदारांवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - एका भूखंडावरील कब्जा हटवून देण्यासाठी पैसे घेतल्यावर आणखी मागितलेले पैसे न मिळाल्याने एकावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून बेदम मारहाण केल्या प्रकरणी भाजपच्या माजी युवा जिल्हाध्यक्ष निलेश सोनी सह त्याच्या २४ ते २९ साथीदारांवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
मीरारोडच्या नया नगर भागात राहणाऱ्या प्रॉपर्टी एजंट पेसनवाज खान ( ३२ ) हा मुलाला शाळेत सोडून घरी जात असताना परिचयातील फैजल हा भेटला . घाबरलेल्या फैजल याने सांगितले कि त्याचा मित्र सकुर याचा कनकिया स्टार बाजार समोर एक भूखंड असून त्यात ठेवलेला भाडेकरू जागा रिकामी करत नव्हता. भूखंड रिकामी करण्याचे काम निलेश सोनी याने करून दिले व त्या बदल्यात त्याला पैसे दिले . पण सोनी हा आणखी पैसे मागत आहे .
पेसनावज याने सुकून याला घेऊन सोनीच्या कार्यालयात जाऊ सांगितले . त्याप्रमाणे सुकून व फैजल हे दोन लाख रुपये घेऊन पेसनवाज सह सोनीच्या पूनम गार्डन येथील कार्यालयात गेले . तेथे सोनी नसल्याने परत फिरले व पुन्हा काही वेळाने त्याच्या कार्यालयावर गेले . तेव्हा सोनी याने सुकूर ला कॉल केला व भूखंड रिकामी करून दिल्या बद्दलचे उर्वरित पैश्यांची मागणी करत शिवीगाळ केली . तेव्हा पेसनवाज याने मोबाईल घेतला असता सोनी याने सुकूरने १० पेटी आणले आहेत का ? अशी विचारणा केली .
त्या नंतर पेसनवाज , सुकुर व फैजल हे तिघे तेथून निघाले व सुकूर याच्या भूखंडावर पोहचले . तेव्हा रस्त्याच्या बाजूला बऱ्याच दुचाकी आणि सोनी याची फॉर्च्युनर गाडी दिसली . टोळी पाहून सुकूर घाबरून पळून गेले . तर सोनी याचे साथीदार इरफान मचाव ग्रुप , गोविंद, अन्वर, तौकीर व २० ते २५ गुंड पेसनवाज जवळ आले . इरफान याने गुप्तीने पेसनवाज च्या डोक्यावर वार केला तर गोविंद याने चाकूने पाठीत वार केले . तर अन्य साथीदारांनी लाकडी बांबू , दगड आदीने मारहाण केली . सुकूरच्या गाडीच्या काचा फोडल्या . वसीम हा पेसनवाज याला वाचवण्यास मध्ये पडला तर राडा पाहून लोकांची गर्दी जमू लागल्याने गुंडानी तेथून पोबारा केला . मीरारोड पोलिसांना ह्या घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहचले . पेसनवाज याला रुग्णालयात दाखल केले . पोलिसांनी निलेश सोनी सह त्याचे साथीदार असे एकूण २५ ते ३० जणांवर विविध कलमां खाली गुन्हा दाखल केला आहे . एकास अटक केली असून सोनी सह अन्य आरोपीं सह गुन्ह्यात वापरलेली वाहने , हत्यारे आदींचा शोध पोलीस करत आहेत .
सोनी हे माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांचे समर्थक मानले जातात . परंतु मोठ्या रकमेच्या बदल्यात भूखंड रिकामी करून देण्याचे काम भाजपाच्या कार्यकर्त्या कडून केले जात असल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे . ह्या आधी देखील सोनी वर गुन्हे दाखल आहेत . कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला सुद्धा सोनी याने दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल होता .