रवी पुजारीविरुद्ध तीन जिल्ह्यात चालणार खटले; नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची सरकारकडून नियुक्ती
By अझहर शेख | Updated: July 20, 2022 15:39 IST2022-07-20T15:38:35+5:302022-07-20T15:39:55+5:30
Ravi pujari : या सर्व खटल्यांसाठी सरकारपक्षाकडून बाजू मांडण्याकरिता अजय मिसर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

रवी पुजारीविरुद्ध तीन जिल्ह्यात चालणार खटले; नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची सरकारकडून नियुक्ती
नाशिक : छोटा राजनचा हस्तक कुविख्यात आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारीच्या सर्व खटल्यांमध्ये नाशिकचे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाकडून काही दिवसांपुर्वीच काढण्यात आली आहे.
खंडणी वसुलीसाठी खून करणे, सुपारी घेऊन खून करणे, खूनाचा प्रयत्न, खंडणी मागणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या कुविख्यात रवी पुजारी यास सेनेगलमधून २०२०साली भारतात आणण्यात आले आहे. लवकरच त्याच्यावरील मोक्कासह राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील प्रलंबित खटल्यांच्या नियमित न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे. मुंबई, ठाणे व नाशिक या तीन जिल्ह्यांतील जिल्हा सत्र न्यायालयात पुजारीविरुद्धच्या खटल्यांची सुनावणी चालणार आहे. या सर्व खटल्यांसाठी सरकारपक्षाकडून बाजू मांडण्याकरिता अजय मिसर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुजारी याने अनेक बिल्डर-डेव्हलपर्स, व्यापारी सीनेअभिनेते सेलेब्रेटिज यांचा खून करणे, खूनाचा प्रयत् करणे, खंडणी उकळणे यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. पुजारी हा परदेशांमधून त्याच्या संघटित गुन्हेगारीचे ‘नेटवर्क’ राज्यात चालवित होता. त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांच्या पथकांना तो वारंवार गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला जाळ्यात घेतले. पुजारीचे प्रत्यार्पण प्रक्रियेतदेखील मिसर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यास फेब्रुवारी २०२० साली सेनेगलच्या दकार येथू न सर्व तांत्रिक प्रक्रिया पार पाडून भारतात आणण्यात आले आहे.