खामगावात साडेचार लाख रुपयांची रोकड पकडली !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 08:35 PM2019-04-02T20:35:35+5:302019-04-02T20:39:09+5:30
शहरात खळबळ; रोख रक्कम निवडणूक विभागाकडे जमा
खामगाव - एका कारमधून जळगाव जामोदकडे नेल्या जाणारी साडेचार लाख रुपयांची रोख रक्कम निवडणूक विभागाच्या स्थिर संरक्षण पथकाने पकडली. शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका मळ्याजवळ सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. रक्कमेच्या तपासणीनंतर सदर रक्कम निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.
बुलडाणा येथून जळगाव जामोदकडे जात असलेल्या एम एच २८-व्ही-१०५४ या इंडिका कारची निवडणूक विभागाच्या स्थिर संरक्षण पथकाने तपासणी केली असता या कारमध्ये साडेचार लाख रुपयांची रक्कम आढळून आली. त्यामुळे स्थीर संरक्षण पथकाने कार चालक राजू भिकाजी जायभाये रा. किनगाव जट्टू आणि सुरेश परसराम जाधव रा. किनगाव जट्टू यांना ताब्यात घेतले. शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये रक्कमेची तपासणी केल्यानंतर सदर रक्कम निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली. निवडणूक विभागाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल. स्थिर संरक्षण पथक प्रमुख निखिल कवाडे, वाहतूक पोलिस रफीक शहा, राहुल इंगळे, सागर मोरे, गजानन चोपडे, पीएसआय सुरवाडे, बाळू फुंडकर यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. तथापि, ही रक्कम कामगारांचे वेतन अदा करण्यासाठी तथा किरकोळ बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी घेवून जात असल्याचे शासकीय कंत्राटदार सुरेश परसराम जाधव रा. किनगाव जट्टू यांनी चौकशी दरम्यान सांगितले.