महिलेला हिप्नॉटाइझ करून एटीएममधून काढून घेतली रोख रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 11:56 AM2018-11-11T11:56:47+5:302018-11-11T11:56:59+5:30
हिप्नॉटाइझ करून एटीएम कार्डवरील रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - आतापर्यंत शस्त्राचा धाक दाखवून, दमदाटी करून लुटालूट केल्याचे प्रकार तुम्ही ऐकले असतील. पण चक्क एका महिलेला हिप्नॉटाइझ करून तिच्याकडील एटीएम कार्डवरील रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दक्षिण दिल्लीतील परिसरामध्ये ही घटना घडली आहे.
एका एनजीओच्या प्रसारमाध्यम विभागात काम करणाऱ्या बरखा हजारिका नामक आसामी महिलेने यासंदर्भातील तक्रार दिली आहे. पीडित महिला घरी असताना एक अनोळखी इसम तिच्या घरी आला. त्याने जवळील गुरुद्वारात होणाऱ्या उत्सवासाठी पैसे गोळा करत असल्याचे सांगत या महिलेकडे पैशांची मागणी केली. या महिलेने त्याला दोनशे रुपयांची नोट देऊन उरलेले पैसे परत करण्यास सांगितले. मात्र त्याने सर्व पैसे स्वत: जवळ ठेवले. त्यानंतर तो घरात घुसला. तसेच आसाममध्ये राहणारी तिची आई काही दिवसांत मरण पावणार आहे, अशी भविष्यवाणी त्याने पीडित महिलेला सांगितली. तसेच हे रोखण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, असे सांगून त्याने या महिलेला हिप्नॉटाइझ केले. तसेच तिच्याकडून घरातील रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर या महिलेला एटीएममध्ये नेऊन तिच्याकडून काही रक्कम काढून घेतली. मग या महिलेला घरी सोडून हा इसम फरार झाला.
दरम्यान, घरी पोहोचल्यावर आपली फसवणूक झाल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आहे. दरम्यान, या तरुणाने सांगितलेल्या गुरुद्वाराच्या ठिकाणी अधिक चौकशीसाठी ही महिला गेली असता अशा प्रकारच्या काही घटना परिसरात याआधीही घडल्याची माहिती समोर आली. या महिलेचे एकूण चार हजार रुपये या चोरट्याने लांबवले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस अधिक तपास करत आहेत.