संतापजनक! भरधाव ट्रकमधून गायींना रस्त्यावर फेकलं; तब्बल २२ किलोमीटर चालला पाठलाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:33 AM2022-04-11T11:33:27+5:302022-04-11T11:34:58+5:30
पोलीस गोतस्करांचा पाठलाग करत होते; पोलिसांची वाहनं उलटावीत म्हणून तस्कर धावत्या ट्रकमधून गायी फेकत होते
गुरुग्राम: चालत्या ट्रकमध्ये गायींना रस्त्यात फेकण्यात आल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार हरयाणातील गुरुग्राममध्ये घडला आहे. पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या कार उलटाव्यात यासाठी गोतस्करांनी गायींना भरधाव ट्रकमधून फेकले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी रात्री हा भयंकर प्रकार घडला.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक ट्रक रस्त्यावर भरधाव वेगात धावताना दिसत आहे. या ट्रकमधून एकापाठोपाठ एक गायी रस्त्यावर फेकल्या जात आहेत. पोलीस फिल्मी स्टाईलनं ट्रकचा पाठलाग करत आहेत. २२ किलोमीटर पाठलाग केल्यानंतर गोतस्कर पकडले गेले. पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलं आहे.
पाठलाग करणाऱ्या वाहनांना अपघात व्हावा यासाठी गोतस्कर धावत्या ट्रकमधून गायींना बाहेर फेकत होते. मात्र पाठलाग थांबला नाही. त्यामुळे दोन तस्करांनी उड्डाणपुलावरून खाली उडी घेतली. त्यांच्या हातापायाला फ्रॅक्चर झालं. बल्लू, तस्लीम, पापा, शहीद आणि खालिद अशी आरोपींची नावं आहेत. हे सगळे मेवातमधील नूहचे रहिवासी आहेत.
सेक्टर २९ मधून ६-७ गायींची तस्करी होणारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नाकाबंदी करण्यात आली, असं गुन्हे शाखेचे डीसीपी राजीव देसवाल यांनी सांगितलं. पोलीस मागे लागल्यानं आरोपी धावत्या ट्रकमधून गायींना रस्त्यात फेकू लागले. त्यामुळे गायींना दुखापत झाली. त्यांच्यावर सध्या उपचार सुकू आहेत. आरोपींकडून एक देशी पिस्तुल, १ जिवंत काडतुसं ताब्यात घेण्यात आलं आहे.