राज्यभरात १३० ठिकाणी गुरे चोरणारी चार जणांची टोळी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 11:12 PM2021-12-06T23:12:49+5:302021-12-06T23:13:34+5:30
चाळीसगाव तालुक्यात सातत्याने होणार्या पशुधन चोरीनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी नाकाबंदी केली होती.
चाळीसगाव जि. जळगाव : जळगावसह राज्यभरातील १३० ठिकाणी गुरांची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीस चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव त्याप्रमाणे नाशिक, औरंगाबाद, धुळे जिल्ह्यातही गुरे चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत ३३ गुरे आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत.
सलीम मोहंमद शरीफ (रा.हुडको कॉलनी,मालेगाव), मन्नान शेख जब्बाद शेख (रा.मालदा शिवार,मालेगाव), फौजान शेख फारुख (रा.वीस फुटी रोड,मालेगाव) आणि सलमान खान दस्तगीर खान (रा.मदरसा शाळेजवळ, मालेगाव) अशी या आरोपींची नावे आहेत.
चाळीसगाव तालुक्यात सातत्याने होणार्या पशुधन चोरीनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी नाकाबंदी केली होती. यात रोहिणी गावाजवळील एका हॉटेलजवळ गुरे चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली होती. या टोळीची सखोल चौकशी केल्यानंतर राज्यभरात या टोळीने धुमाकूळ घातल्याचे उघड झाले होते.
चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील नऊ, मेहुणबारे हद्दीतील तीन व चाळीसगाव शहर पोलिस ठाणे हद्दीतील दोन ठिकाणाहून आरोपींनी गुरांची चोरी केल्याचे तपासात उघड झाले तसेच नाशिक, धुळे व औरंगाबाद भागातील २० ठिकाणावरून आरोपींनी गुरे चोरुन नेले होते.
संशयितांनी विविध ठिकाणाहून चोरलेली एकूण ३३ गुरांची विक्री मालेगाव येथे केली होती. त्यात सात मोठ्या गायी, आठ कालवडी, १२ गोर्हे, सहा वासरांचा समावेश आहे. तसेच गुन्ह्यातील वाहन (क्र.एम.एच.03 सी.बी.५२३१) व दुचाकी (एम.एच.४१ ए.एच.२६९४) जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.