सात बारा वर नोंदीसाठी ५० हजारांची लाच घेणारे तलाठी, कोतवाल जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 03:34 PM2019-01-03T15:34:22+5:302019-01-03T15:35:38+5:30
जमिनीच्या ७/१२ वर नाव नोंद करणे व क्षेत्र नोंदी घेण्यासाठी तक्रारदारांनी भूगावच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधला़.
पुणे : वारस नोंदीच्या प्रकरणात नाव नोंद व क्षेत्र नोंद ७/१२ वर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठी व कोतवाल यांना रंगेहाथ पकडले़. मनिषा सर्जेराज पवार (वय ३७, तलाठी, भूगाव) आणि विठ्ठल गुलाब सुर्वे (वय ३७, कोतवाल, भूगाव) अशी त्याची आरोपींची नावे आहेत़. तक्रारदार यांचे क्षेत्र व वारस नोंदीचे प्रकरणात मुळशी तहसिलदार यांनी आदेश दिला होता़. त्यानुसार भूगावमधील जमिनीच्या ७/१२ वर नाव नोंद करणे व क्षेत्र नोंदी घेण्यासाठी तक्रारदारांनी भूगावच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधला़. तेव्हा तलाठी मनिषा पवार यांनी ५० हजार रुपयांची कोतवालामार्फत लाच मागितली़. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़. त्या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे स्पष्ट झाले़. त्यानुसार गुरुवारी भूगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला़. कोतवाल याच्या मार्फत तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़. पौड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.