क्लासमध्ये कॉपी करताना पकडले; पालक ओरडतील म्हणून मुलाने गोवा गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 08:02 AM2022-10-12T08:02:51+5:302022-10-12T08:03:20+5:30
काही तरी आमिष दाखवून मुलाला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबाने दिली होती. १४ वर्षांच्या मुलाला क्लासमधील परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर शिक्षकांनी घरी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : क्लासमधील परीक्षेत कॉपी करताना पकडल्याचे शिक्षकांनी घरी सांगितले. घरी गेल्यावर आई-वडील ओरडतील म्हणून येथील १४ वर्षांच्या मुलाने पलायन केले होते. या मुलाला नालासोपारा पोलिसांनी गोव्यातून आणून सोमवारी (दि. १०) रात्री कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
काही तरी आमिष दाखवून मुलाला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबाने दिली होती. १४ वर्षांच्या मुलाला क्लासमधील परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर शिक्षकांनी घरी सांगितले.
घरी गेल्यावर आई-वडील ओरडतील म्हणून तो मुलगा २७ सप्टेंबरला संध्याकाळी क्लास सुटल्यावर घरी न जाता पळून गेला होता. घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी आजूबाजूला, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याकडे शोध घेतला; पण तो सापडला नाही. अखेर कोणीतरी फूस लावून किंवा आमिष दाखवून त्याला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबाने २८ सप्टेंबरला दिली होती.
पोलीस उपनिरीक्षक तायडे आणि त्यांचे पथक तपास करत असताना ८ ऑक्टोबरला तो मुलगा पुण्याला दिसला होता. पोलिसांनी पुण्याला जाऊन शोध घेतला; पण तो सापडला नव्हता. पाेलिसांनी अधिक तपास केला असता त्याला गाेव्यातून
ताब्यात घेतले.
५०० रुपये घेऊन गाठले गाेवा
मुलाने पुण्यातून एकाकडून ५०० रुपये घेऊन रेल्वेने गोवा गाठले होते. तेथे टीसीने त्याला पकडून मडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. मडगाव पोलिसांनी नालासोपारा पोलिसांना माहिती दिल्यानंतर मुलाला आईवडिलांच्या ताब्यात दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.