बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या चार डमी विद्यार्थ्यांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:29 PM2022-03-11T20:29:12+5:302022-03-11T20:29:44+5:30
HSC Exam : हे चौघे मुंबईच्या गोरेगाव आणि जोगेश्वरी येथील रहिवासी आहेत.
नालासोपारा : बारावीच्या माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेसाठी बसलेल्या तोतया (डमी) चार परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी नालासोपारा शहरात घडली आहे. कॉलेजच्या तक्रारीवरून पेल्हार पोलिसांनी चारही तोतया परीक्षार्थींवर गुन्हा दाखल केला आहे. हे चौघे मुंबईच्या गोरेगाव आणि जोगेश्वरी येथील रहिवासी आहेत.
नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग नाका येथील सुदर्शन इंग्लिश ज्युनिअर स्कूल अँड कॉलेजमध्ये बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार डमी परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. परीक्षा नियंत्रक कक्षाचे समन्वयक शिक्षक यांनी चार डमी परीक्षार्थींचे हॉल तिकीट व स्टॅम्प लिस्ट तपासले असता, कृष्णधवल फोटोवर दुसरा रंगीत फोटो लावलेला होता. हा फोटो व प्रत्यक्ष परीक्षार्थी वेगवेगळे असल्याचे आढळून आले. या प्रकरणी शाळेचे चिंतामणी पांडे (५४) यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन रोहन गुप्ता, विनोद चौहान, ओमप्रकाश जाधव आणि रोहित यादव या चारही डमी परीक्षार्थींवर गुन्हा दाखल केला आहे.