५ किलो लाडूचा हट्ट नडला, पोलीस कर्मचारी कोट्यधीश निघाला; CBI अधिकारी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 09:42 AM2021-10-29T09:42:01+5:302021-10-29T09:42:49+5:30
तक्रारदार त्यागी मनोज आणि मित्र अनुजविरोधात २३ ऑगस्टला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याची तक्रार झाली होती
नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा CBI च्या निशाण्यावर दिल्लीतील भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत. दिल्लीत CBI ने अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरावर छापे मारले. काही दिवसांपूर्वी CBI नं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक केली. हे प्रकरण थंड होत नाही तोवर CBI टीमनं एका पोलीस अधिकाऱ्यावर धाड टाकली. हा अधिकारी ५ लाख वसुली करण्यासाठी हट्ट करुन बसला होता.
पीडितांसोबत डील झाल्यानंतर उपनिरीक्षकाने मोबाईलवर बोलताना लाचेच्या ५ लाख रुपयाला ५ किलो लाडू कोडवर्क दिलं होतं. म्हणजे सीबीआय अथवा कुणीही मोबाईल रेकॉर्डिंग तपासलं असता त्यांना समजणार नाही. किंवा पकडलं गेलं तरी कुणीही सिद्ध करु शकणार नाही यासाठी दिशाभूल करण्यासाठी त्याने कोडवर्ड ठेवला. या अधिकाऱ्याचं नाव भोजराज असं आहे. CBI ने भोजराज सिंहला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. भोजराज दक्षिणी दिल्लीच्या मैदान गढी पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
५ किलो एकटा थोडी खाणार
लाच घेण्याच्या आरोपात अटकेत असलेला उपनिरीक्षक भोजराज सिंह याला सीबीआयनं अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीसोबत झालेल्या डीलनुसार संवादात ५ किलो लाडू एकटा थोडी खाणार. यातील काही लाडू साहेबांना मिळणार. आता हा साहेब कोण आहे? लाचेच्या रक्कमेत कुणाची भागीदारी होती. याचाही शोध CBI कडून घेतला जाणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
CBI प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर छापे मारले असते त्याठिकाणी १ कोटी १२ लाख रुपये रोकड सापडली. तक्रारदार त्यागी मनोज आणि मित्र अनुजविरोधात २३ ऑगस्टला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याची तक्रार झाली होती. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक भोजराज सिंह करत होते. हनीने २६ ऑक्टोबरला CBI मध्ये तक्रार देत जामीन अर्जाचा विरोध न करण्यासाठी भोजराज सिंह यांनी ५ लाखाची लाच मागितली असा आरोप केला. त्यानंतर २ लाख रुपये देण्यास तक्रारदार मान्य झाला. २ लाखाच्या बदल्यात पोलिसांनी आरोपींविरोधात कोर्टात ठोस बाजू मांडू नये असं ठरलं होतं. CBI ने तक्रारदार आणि पोलीस कर्मचारी यांच्यातील फोन संवाद ऐकला. त्यानंतर रक्कमेसाठी लाडू आणि साखर कोडवर्डचा वापर करण्यात आला. ५ किलो लाडूची सोय करा असं भोजराज सिंहने लाचेच्या स्वरुपात मागितले होते.