अटक नको तर १ कोटी रुपयेच हवेत, तेही आताच हवेत; व्यापाऱ्याने ५० लाख दिले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 06:57 AM2023-05-05T06:57:30+5:302023-05-05T06:58:04+5:30

मुंबईस्थित श्री बुलियन कंपनीच्या एका तपासाप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक धीरेन्द्र कुमार याने सोने व्यापार करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कार्यालयातून उचलले आणि त्याला सीजीएसटीच्या कार्यालयात आणले.

CBI case against CGST officer for demanding, accepting bribe | अटक नको तर १ कोटी रुपयेच हवेत, तेही आताच हवेत; व्यापाऱ्याने ५० लाख दिले, मग...

अटक नको तर १ कोटी रुपयेच हवेत, तेही आताच हवेत; व्यापाऱ्याने ५० लाख दिले, मग...

googlenewsNext

मनोज गडनीस 
मुंबई : मुंबईत सीबीआयने केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात (सीजीएसटी) कर चुकवेगिरी विरोधी विभागात अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या धीरेन्द्र कुमार विरोधात एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीबीआय त्याचा शोध घेत आहे.

घटना काय आहे ?
मुंबईस्थित श्री बुलियन कंपनीच्या एका तपासाप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक धीरेन्द्र कुमार याने सोने व्यापार करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कार्यालयातून उचलले आणि त्याला सीजीएसटीच्या कार्यालयात आणले. तिथे त्याला ५ तास बसवून ठेवले. त्यानंतर त्याला अटक करण्याची धमकी दिली. अटकेची कारवाई टाळायची असेल तर त्याने त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. 

सेटलमेंट कशी झाली ?
अटक नको तर एक कोटी रुपयेच हवेत आणि तेही आताच हवेत, या मागणीवर धीरेन्द्र कुमार ठाम होता. मात्र, ताब्यात असलेल्या व्यापाऱ्याने कसेबसे त्याला ५० लाख रुपयांपर्यंत खाली आणले. ५० लाखांपैकी २५ लाख आता दोन तासांत देतो आणि उरलेले २५ लाख उद्या सकाळी देतो, असे सांगितले. या पैशांची व्यवस्था करण्यासाठी एका मित्राला फोन करू देण्याची विनंती या व्यापाऱ्याने धीरेन्द्र कुमारला केली. मग या व्यापाऱ्याने व्हॉटस्ॲपवरून आपल्या मित्राला फोन केला आणि पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले.

...असा अडकला अधिकारी
सीजीएसटी कार्यालयात दबावाखाली असलेल्या मित्रासोबत अधिकाऱ्याच्या लाचखोरीसंदर्भातील हे बोलणे त्याच्या मित्राने समोर एक फोन लपवून त्यात त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. हेच व्हिडीओ रेकॉर्डिंग त्याने सीबीआयला दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये पुरावा म्हणून जोडले.
हा व्हिडीओ तसेच या व्यापाऱ्याला जारी केलेल्या समन्सवर असलेली धीरेन्द्र कुमारची स्वाक्षरी, या व्यापाऱ्यासोबत कार्यालयात येतानाचे सीसीटीव्ही फुटेज अशा गोष्टींची पडताळणी करून सीबीआयने धीरेन्द्र कुमार आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला. 

चर्चगेट स्टेशनजवळ एक करड्या-निळ्या रंगाची हीरो ग्लॅमर बाइक उभी असेल. त्याचा नंबर एमएच-०१-ईजी-१०२३ हा आहे. या बाइकवर दोन जण असतील. त्यांच्याकडे पैशांची बॅग द्यायची आणि निघून जायचे. त्यांच्याशी बोलायचे नाही. २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळताच बाइकस्वार सुसाट तिथून निघून गेले. 

साथीदार कोण ?
अनेक अधिकारी लाचेचे पैसे स्वतः स्वीकारत नाहीत. त्याकरिता त्यांची खास माणसे नेमलेली असतात. या प्रकरणात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जो तपास केला त्यात अँटॉप हिल परिसरात मुकेश ज्वेलर्स या दुकानाचा मालक असलेला अमृतपाल संखाला आणि त्याच्या दुकानातील कर्मचारी बबन हे दोघे सहभागी असल्याचे आढळून आले. हेच दोघे बाइकवरून पैसे घेण्यासाठी चर्चगेट स्टेशनजवळ आले होते. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरु केला आहे.

Web Title: CBI case against CGST officer for demanding, accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.