शीना बोरा प्रकरणाचा तपास पूर्ण, सीबीआयने विशेष न्यायालयाला दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 08:51 AM2021-08-19T08:51:34+5:302021-08-19T08:52:03+5:30

Sheena Bora murder case: सीबीआयने आतापर्यंत मुख्य दोषारोपपत्र व त्यानंतर दोन पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. त्यात शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी हे आरोपी आहेत.

CBI completes probe into Sheena Bora murder case:, CBI informs special court | शीना बोरा प्रकरणाचा तपास पूर्ण, सीबीआयने विशेष न्यायालयाला दिली माहिती

शीना बोरा प्रकरणाचा तपास पूर्ण, सीबीआयने विशेष न्यायालयाला दिली माहिती

googlenewsNext

मुंबई : शीना बोरा हत्याकांडाचा २०१५ पासून सुरू असलेला तपास पूर्ण झाल्याची माहिती सीबीआयने विशेष न्यायालयाला मंगळवारी दिली. गेली सहा वर्षे सीबीआय या प्रकरणाचा तपास करत होती. यामध्ये शीनाची आई इंद्राणी मुखर्जी ही मुख्य आरोपी आहे.
सीबीआयने आतापर्यंत मुख्य दोषारोपपत्र व त्यानंतर दोन पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. त्यात शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी हे आरोपी आहेत.
२०१२ मध्ये २५ वर्षीय शीनाची हत्या केल्याप्रकरणी इंद्राणीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर तीन महिन्यांत पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली. शीनाची हत्या करण्यात इंद्राणीला मदत केल्याचा आरोप पीटरवर आहे.
२०१२ मध्ये झालेली हत्या २०१५ मध्ये इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला अन्य एका प्रकरणी अटक केल्यावर उजेडात आली.
शीनाची हत्या इंद्राणीने श्यामवर राय व दुसरा पती संजीव खन्ना यांच्या मदतीने केली.
पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल व शीना यांचे प्रेम इंद्राणीला खटकत होते. शीनाची हत्या केल्यावर इंद्राणीने शीनाच्या मैत्रिणीला ती अमेरिकेत राहायला गेल्याचे सांगितले, असे सीबीआयचे म्हणणे आहे. श्यामवर रायने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबत शीनाचा मृतदेह पनवेल येथील जंगलात पुरल्याचे उघडकीस आले. शीना आणि इंद्राणीमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याने शीनाने इंद्राणीचे बिंग फोडण्याची धमकी दिली. कारण इंद्राणी शीना आपली बहीण असल्याचे सर्वांना सांगत होती.

आतापर्यंत ६० साक्षीदारांचे जबाब नोंदवले
- या प्रकरणाचा खटला २०१७ मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत ६० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान, कारागृहातच असताना इंद्राणी आणि पीटरने त्यांचे १७ वर्षांचे पती-पत्नीचे नाते संपवले. २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पीटरची गेल्या वर्षी जामिनावर सुटका करण्यात आली, तर इंद्राणी अद्याप कारागृहात आहे.

Web Title: CBI completes probe into Sheena Bora murder case:, CBI informs special court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.