सीबीआयकडून अनिल देशमुख यांची कारागृहात चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:53 AM2022-03-04T11:53:32+5:302022-03-04T11:54:01+5:30
सीबीआयला देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात सीबीआयला देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार गुरुवारपासून सीबीआय आर्थर रोड कारागृहात देशमुख यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली आहे.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाॅण्ड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. दुसरीकडे चांदीवाल आयोगासमोरील चौकशीदेखील अंतिम टप्प्यात आहे. यातच सीबीआयने त्यांच्याकडे पुन्हा चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी, याबाबत सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
सत्र न्यायालयाकडून ३ ते ६ तारखेपर्यंत चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार गुरुवारी सीबीआयचे पथक आर्थर रोड कारागृहात त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यानुसार आज चौकशी करत, पथक शुक्रवारी पुन्हा कारागृहात जाणार आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीतून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.