'ते' दोघं खुर्चीत बसले होते... अचानक गणपत गायकवाड केबिनमध्ये आले अन्...; थरारक CCTV फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 03:18 PM2024-02-03T15:18:02+5:302024-02-03T15:41:06+5:30

गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरच्या द्वारली येथील जमिनीवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता.

CCTV footage of BJP MLA Ganpat Gaikwad firing at Shiv Sena leader Mahesh Gaikwad | 'ते' दोघं खुर्चीत बसले होते... अचानक गणपत गायकवाड केबिनमध्ये आले अन्...; थरारक CCTV फुटेज

'ते' दोघं खुर्चीत बसले होते... अचानक गणपत गायकवाड केबिनमध्ये आले अन्...; थरारक CCTV फुटेज

उल्हासनगर - BJP MLA Ganpat Gaikwad Firing ( Marathi News ) भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड आणि कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील शीतयुद्ध अखेर गोळीबारापर्यंत पोहचलं. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षकाच्या केबिनमध्येच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळी झाडली. या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज आता माध्यमांसमोर आले आहेत. गायकवाड यांनी केबिनमध्ये प्रवेश घेत बेछूट गोळीबार केला. 

गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरच्या द्वारली येथील जमिनीवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. या वादग्रस्त जागेवर महेश गायकवाड यांनी कब्जा केला होता असा आरोप आहे. त्याचबाबत गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले होते. तिथे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हेदेखील पोहचले. हिललाईन पोलीस निरिक्षकांच्या केबिनमध्ये दोन्ही गटाचे प्रमुख लोक बसले होते. पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी होती. त्यात काही वाद झाल्याने पोलीस निरिक्षक उठून बाहेर गेले. तितक्यात आमदार गणपत गायकवाड यांनी दुसऱ्या दरवाजाने प्रवेश घेतला. त्यावेळी महेश गायकवाड, राहुल पाटील यांचे लक्ष नसताना अचानक त्यांच्यावर गायकवाड यांच्याकडून गोळीबार सुरू झाला. 

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गणपत गायकवाड हे त्यांच्याकडील पिस्तुलातून बेछूट गोळीबार करताना दिसत आहे. या गोळीबारातून महेश गायकवाड, राहुल पाटील यांनी वाचण्याचा प्रयत्न केला. त्यात राहुल पाटील यांच्या हाताला, खांद्याला गोळी लागली. मात्र गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या. यावेळी लपण्यासाठी महेश गायकवाड यांनी केबिनच्या दरवाजाचा वापर केला. परंतु गायकवाड यांनी हातातील बंदुकीसह गायकवाड यांच्यावर हल्ला चढवला. या झटापटीत बाहेरील जमाव आणि पोलीस केबिनमध्ये शिरले. त्यानंतर दोन्ही गटात केबिनमध्येच हाणामारी झाली. या गोंधळात पोलिसांनी धाडसाने आमदार गणपत गायकवाड यांना रोखून तात्काळ ताब्यात घेतले. तर महेश गायकवाड, राहुल पाटील या दोन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेले. 

कोण आहे गणपत गायकवाड?

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. २००९ च्या निवडणुकीत गणपत गायकवाड हे अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहिले. त्यात त्यांचा विजय झाला. त्यानंतरच्या काळात भाजपासोबत त्यांची जवळीक झाली. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्याठिकाणी ते पुन्हा निवडून आले. २००९ ते २०१९ या काळात सलग तीन वेळा गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वचे आमदार आहेत.  

कोण आहे महेश गायकवाड?

महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख आहेत. गायकवाड हे आधीपासून शिवसेनेत सक्रीय आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. शिंदे यांनी ठाकरेंशी फारकत घेतली त्यानंतर महेश गायकवाडही त्यांच्या गटात आले. महेश गायकवाड हे २०१७ च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत संतोष नगर या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर पक्षाकडून त्यांना विभागप्रमुख आणि आता शहरप्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती असतानाही महेश गायकवाड यांनी युतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या उघडपणे विरोधात जात शिवसेना बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देत त्यांचा प्रचार केला होता. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील शीतयुद्ध खूप वर्षापासूनचे आहे. त्यात हे दोघेही केबल व्यावसायिक आहेत. 
 

Web Title: CCTV footage of BJP MLA Ganpat Gaikwad firing at Shiv Sena leader Mahesh Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.