दादर चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाचे सीडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 05:40 PM2018-08-18T17:40:31+5:302018-08-18T21:19:33+5:30
सीडीआरएफचे जवान मनोज पाटील, गोपाळ सरदार, शिवानंदन फड आणि रामदास नागरजोगे यांनी ओंकारला जीवरक्षकाची भूमिका पार पाडत पाण्याबाहेर काढले.
मुंबई - शहर आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी (सीडीआरएफ) काल सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एका बुडणाऱ्या १६ वर्षीय मुलाचे प्राण वाचविले आहे. ओंकार चव्हाण या मुलगा मित्रांसोबत दादर - माहीम चौपाटीवर फुटबॉल खेळत होता. त्यावेळी समुद्राच्या पाण्यात गेलेला फुटबॉल आणण्यास ग्लेल्या ओंकारला पाण्याच्या पातळीचा अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडत होता. दरम्यान,प्रसंगावधान दाखवत सीडीआरएफचे जवान मनोज पाटील, गोपाळ सरदार, शिवानंदन फड आणि रामदास नागरजोगे यांनी ओंकारला जीवरक्षकाची भूमिका पार पाडत पाण्याबाहेर काढले.
ओंकार हा माहीम कोळीवाड्यात राहणार असून तो मित्रांसोबत चौपाटीवर फुटबॉल खेळण्यास आला होता. खेळता खेळता फुटबॉल समुद्राच्या पाण्यात गेला. त्यावेळी ओंकार फुटबॉल काढण्यास पाण्यात गेला. पाण्याचा अंदाज नसल्याने समुद्रात उसळलेल्या लाटा त्याला पाण्यात खेचून घेत होत्या. दरम्यान, ओंकार बुडताना पाहून सीडीआरएफच्या चौघांनी ओंकारला सुखरूप बाहेर काढले. तसेच स्थानिक पोलिसांच्या ताब्यात ओंकारला देण्यात आले. १५ ऑगस्टदिवशी देखील ३ विद्यार्थ्यांना शिवाजी पार्क चौपाटीवर बुडताना सीडीआरएफच्या जवान अमिता हजारे आणि पालवे यांनी वाचविले होते.