उड्डाणपुलावर 'बर्थ डे' सेलिब्रेट करणं पडलं महागात, २१ जणांना अटक अन् ८ लग्जरी कारही जप्त; नेमकं काय घडलं पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 03:47 PM2022-09-29T15:47:08+5:302022-09-29T15:48:06+5:30
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका उड्डाणपुलावर गोंधळ आणि वाढदिवसाची पार्टी केल्याप्रकरणी २१ जणांना अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका उड्डाणपुलावर गोंधळ आणि वाढदिवसाची पार्टी केल्याप्रकरणी २१ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आठ आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत. इंदिरापुरम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मंगळवारी मध्यरात्री पूर्व दिल्लीतील जगतपुरी येथील अंश कोहली (२१) याचा वाढदिवस साजरा करत होते. आरोपी कारच्या बोनेटवर केक कापताना आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवताना दिसले.
गाझियाबाद शहराचे पोलिस अधीक्षक ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कार पार्क करून वाहतुकीला अडथळा आणला. यासोबतच तेथून जाणाऱ्या इतर प्रवाशांनाही त्यांनी अपशब्द वापरले. सर्व २१ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
व्हायरल झाला होता सेलिब्रेशनचा व्हिडिओ
गाझियाबादमध्ये तरुणांकडून उड्डाणपुलावर वाढदिवस साजरा आणि धिंगाणा घातला जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. गाझियाबाद पोलिसही अशा फोटो आणि व्हिडिओंवर सतत कारवाई करत आहेत. यासोबतच उड्डाणपुलांवर अशा घटना रोखण्यासाठी गाझियाबाद पोलिस अधिकाऱ्यांकडून दोन पीआरबीची ड्युटीही लावण्यात आली आहे. गाझियाबादमध्ये मंगळवारी रात्री अशाप्रकारे धिंगाणा आणि वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. २१ तरुणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ८ आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
२१ तरुणांना अटक
इंदिरापुरम पोलिस स्टेशनने उड्डाणपुलावर तैनात असलेल्या पीआरव्हीच्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व तरुण आपला साथीदार अंश कोहलीचा वाढदिवस साजरा करण्यसाठी रहदारीच्या रस्त्यावर जमले होते आणि कार मधोमध पार्क करून धिंगाणा घालत होते. यातील २० तरुण दिल्लीतील वेगवेगळ्या भागातील आहेत, तर एक तरुण गाझियाबादच्या इंदिरापुरम भागातील आहे. त्याचवेळी दोन दिवसांपूर्वी उड्डाणपुलावर अशाच स्वरुपाचा धिंगाणा घालणाऱ्या ४ तरुणांना कोशांबी पोलिसांनी स्विफ्ट कारसह अटक केली होती.
पीआरव्ही टीम लक्ष ठेवणार
सततच्या घटनांनंतर गाझियाबाद पोलिसांनी एलिव्हेटेड रोडवर दोन पीआरव्ही तैनात केले आहेत. त्याचबरोबर फ्लेक्सच्या माध्यमातून तरुणांना जागरुक करण्याचंही काम केलं जात आहे. एलिव्हेटेड रोडवर वाहन पार्क करणं, वाहनात मद्यपान करणं, वाढदिवस किंवा अन्य पार्टी करणं, सेल्फी घेणं, फोटोग्राफी करणं यांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असं गाझियाबाद पोलिसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.