केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असलेला हवाला मध्यस्थी जेरबंद; डीआरआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:36 PM2019-01-04T18:36:21+5:302019-01-04T18:38:51+5:30
ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून न्हावा-शेवा बंदरातील ९ हजार मेट्रीक टन डिझेल तस्करीतील ही रक्कम असल्याची माहिती सुत्रांनी दिली. अटक करण्यात आलेला आरोपी हा केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर होता.जितेंद्र परमार (41) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुंबई - हायस्पीड डिझेलच्या तस्करीचे २० कोटी रुपये हवालामार्फत संयुक्त अरब अमिरातीला पाठवणाऱ्या मध्यस्थाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून न्हावा-शेवा बंदरातील ९ हजार मेट्रीक टन डिझेल तस्करीतील ही रक्कम असल्याची माहिती सुत्रांनी दिली. अटक करण्यात आलेला आरोपी हा केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर होता.जितेंद्र परमार (41) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हवालामार्फत पाठवण्यात आलेल्या पैशामध्ये प्रत्येक दिऱ्हममागे (संयुक्त अरब अमिरातीचे चलन) जितेंद्रला १० पैसे कमीशन मिळत असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. तस्करीच्या मार्गाने न्हावा-शेवा बंदरात ९ हजार मेट्रीक टन डिझेल आणण्यात आले होते. याची किंमत ३७ कोटी रुपये असल्याचे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. संयुक्त अरब अमिरातीतील तेल शुद्धीकरण कारखान्यातून हे डिझेल रसायनांच्या नावाने न्हावा-शेवा बंदरात येते. तेथे कच्च्या तेलाची भेसळ करून हे डिझेल टॅंकरमधून मुंबई, नवी मुंबई व ठाण्याला पाठवण्यात येते. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत मिळत असल्यामुळे भेसळयुक्त डिझेलला मोठी मागणी आहे. तस्करांना लिटरमागे १० ते २० रुपये मिळतात. ऑटोस्टार लुब्रिकंट्स अँड ग्रुप, ऍलोरा पेट्रोकेमिकल्स व फ्लेक्झी इंडिया यांनी हे डिझेल आणले होते. त्यांच्यामार्फत ही रक्कम जितेंद्र परमारला मिळाल्याचे तपासात उघड झाले आहे. जितेंद्र हा हवाला ऑपरेटर वांद्रे पश्चिम येथील रहिवासी असून जितेंद्रने हवाला पद्धतीने २० कोटी रुपये संयुक्त अरब अमिरातीला पाठवले होते. तेव्हापासून तो केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आला होता. त्याच्यावर पाळत ही ठेवण्यात आली होती. हवालामार्फत पाठवण्यात आलेल्या रक्कमेच्या व्यवहारात त्याचा सहभाग असल्याचे डीआरआयने ताब्यात घेतल्यानंतर उघड झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.