दहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 07:55 PM2019-06-15T19:55:34+5:302019-06-15T19:57:19+5:30
केंद्रीय गृहखात्याने नव्या टेरर मॉनिटरिंग ग्रुपची (टीएमजी) स्थापना केली आहे.
नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात दहशतवादी कारवायांसंदर्भात होत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहखात्याने नव्या टेरर मॉनिटरिंग ग्रुपची (टीएमजी) स्थापना केली आहे. एएनआयने अशाप्रकारचे वृत्त दिले आहे. त्यामुळे आता दहशतवादाविरोधात सरकारने नवे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.
एएनआयच्या सुत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस उपमहासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली या नव्या टेरर मॉनिटरिंग ग्रुपची (टीएमजी) स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये गुप्तचर यंत्रणा (आयबी), राष्ट्रीय तपास पथक (एनआयए), केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सेन्ट्रल बोर्ड ऑफ टॅक्स अँड कस्टम्स (सीबीआयसी), सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) या संस्थांचे प्रतिनिधी हे या ग्रुपचे सदस्य म्हणून काम करतील. त्यामुळे भारतात दहशतवादाला खीळ बसवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे असं म्हणता येईल.
Sources: A new Terror Monitoring Group (TMG) has been constituted by Ministry of Home Affairs, recently with Addl. DGP CID J&K, as its Chairman besides representatives from IB, NIA, CBI, CBIC, CBDT & ED as its members. pic.twitter.com/lsgYhcRJlO
— ANI (@ANI) June 15, 2019