साताऱ्यात सेंट्रिंग कामगाराला ओढले ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात; एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: February 17, 2025 00:18 IST2025-02-17T00:18:07+5:302025-02-17T00:18:41+5:30

अपहरण करून उकळली तीन लाखांची खंडणी

Centring worker lured into 'honeytrap' in Satara; Five people including a woman booked | साताऱ्यात सेंट्रिंग कामगाराला ओढले ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात; एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा

साताऱ्यात सेंट्रिंग कामगाराला ओढले ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात; एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: व्हॉट्सॲपवर ओळख झालेल्या एका महिलेने ओळख वाढवून एका सेंट्रिंग कामगाराला ‘हनीट्रॅप’च्या जाळ्यात ओढले. चार साथीदारांच्या मदतीने अपहरण करून कामगाराला तिने डांबून ठेवले आणि १५ लाखांची खंडणी मागून तीन लाख रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार १० फेब्रुवारी रोजी सातारा शहर व परिसरात घडला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एका महिलेस पाच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यातील शाहूपुरी परिसरातील मतकर काॅलनीमध्ये ३८ वर्षीय सेंट्रिंग कामगार वास्तव्यास आहे. एकेदिवशी त्याची व्हॉट्सॲपवर एका महिलेशी ओळख झाली. संबंधित महिलेने सतत फोन करून त्याच्याशी आणखी ओळख वाढवली. तुम्हाला सेंट्रिंगचे काम देते, असे सांगून तिने कामगाराला १० फेब्रुवारी रोजी बोलावून घेतले. पेट्री, ता. सातारा गावच्या हद्दीत घेऊन जाऊन त्या कामगाराला सेंट्रिंगचे काम तिने दाखविले. त्यानंतर कासला जाऊ, असे म्हणून त्याला एकीव परिसरातील एका लाॅजवर नेले.

तेथे दोघांच्या संमतीने त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेथून घरी साताऱ्याकडे येताना पेट्री गावाजवळ आल्यानंतर चाैघांनी त्यांना अडविले. कारमध्ये बसवून मारहाण करून वेचले, ता. सातारा गावच्या हद्दीत त्याला नेण्यात आले.

या ठिकाणी एका खोलीत डांबून ठेवून सेंट्रिंग कामगाराचे सर्व कपडे काढून त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. यावेळी मारहाण करणारे संशयित त्याला माझ्या बहिणीला तू लाॅजवर घेऊन जाण्याची तुझी हिंमत कशी झाली, असे म्हणू लागले. इतक्यात तू आम्हाला पैसे दे. नाहीतर आम्ही तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, असे ती महिला म्हणाल्यावर या सर्वांनी एकत्र येऊन कट रचल्याची त्याला खात्री पटली. तुला यातून वाचायचे असेल तर आताच्या आता १५ लाख रुपये कोणाला तरी घेऊन येण्यास सांग. त्यावेळी कामगाराने घाबरून पत्नीला पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्याची पत्नी घराच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीकडून ३ लाख रुपयांची रोकड घेऊन वेचले येथे गेली. तेथील पुलावर चार तरुण आले. त्या तरुणांनी ते पैसे घेतले. उद्या आणखी दोन लाख रुपये दिले नाहीत तर तुझा व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी देऊन तेथून ते निघून गेले.

काही वेळातच सेंट्रिंग कामगाराचीही त्यांनी सुटका केली. या प्रकारानंतर कामगाराने पत्नीसह थेट सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग पोलिसांसमोर कथन केला. पोलिस उपनिरीक्षक आशिष गुरव हे अधिक तपास करीत आहेत.

‘ती’ महिला ताब्यात

या प्रकरणानंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून, तिचे साथीदार मात्र फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Centring worker lured into 'honeytrap' in Satara; Five people including a woman booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.