चड्डी-बनियन टोळीच्या सराईताला अटक; २४.७४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 02:29 PM2023-05-15T14:29:56+5:302023-05-15T14:30:16+5:30
त्याच्याकडून चोरीला गेलेला २४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
मुंबई : गेल्या सात वर्षांपासून चड्डी-बनियन घालत घरफोड्या करून परराज्यात पळून जाणारा अट्टल सराईत आरोपी चिंटू चौधरी निषाद (३४) याच्या घाटकोपर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीला गेलेला २४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
विद्याविहार परिसरात राहणारे तक्रारदार अभय गोकानी हे ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत लोणावळा येथे फिरायला गेले असताना अज्ञाताने त्यांच्या बेडरूमच्या खिडकीची संरक्षक ग्रील तोडून आत प्रवेश केला. तसेच तिथल्या लाकडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ड्रॉव्हरमधून २४ लाखांचे दागिने आणि रोख ७४ हजार रुपये पळवून नेले. गोकानी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम ४५४, ४५७ व ३८० गुन्हा दाखल केला.
परिमंडळ ७ चे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद कोकाटे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे आणि पथकाने दिवा रेल्वे स्थानक ते साबे गावातील सरकारी तसेच खासगी अशा १९० सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि पुढील कारवाई केली.
विरार, टिळकनगरमधील गुन्ह्यांची उकल होणार
पथक उत्तर प्रदेश राज्यात आरोपीच्या गावी गेले. तिथे तांत्रिक व अल्प कालावधीत गुप्त बातमीदार तयार करून स्थानिक पोलिस ठाणे बन्सी कोतवालीच्या मदतीने तहसील कार्यालयासमोर गर्दीत सापळा रचून शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. या अटकेमुळे विरार, खांदेश्वर, कासारवडवली, टिळकनगर एम. एच. बी. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील जवळपास २० ते २५ गुन्ह्यांची उकल होण्याचा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.