मुंबई पोलिसांना शिस्त लावण्याचे आव्हान, ठोस उपाययोजनांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 09:02 PM2020-03-01T21:02:43+5:302020-03-01T21:06:47+5:30
सायबर, आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध पाहिजे
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरात सर्व प्रकारचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना ठोस उपाय योजना राबविण्याची आवश्यकता भासणार आहे. त्याचबरोबर वर्दीचा गैरफायदा घेत खात्याची प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार वाढत असल्याने त्याला लगाम घालण्यासाठी महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. मावळते आयुक्तसंजय बर्वे यांनी त्यासाठी केलेले प्रयत्न पुढे अधिक गतीने राबविण्याची गरज आहे.
परमबीर सिंग यांना सेवानिवृतीपर्यंत तब्बल २ वर्षे ४ महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना खात्याच्या सुधारणेसाठी दिर्घकालीन उपाययोजना राबविण्याची पुरेपर संधी मिळणार आहे. मुंबईत काम करण्याचा अनुभव असल्याने ते त्यामध्ये यशस्वी होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
जानेवारीमध्ये गँगस्टर इजाज लकडावाला, त्याचे हस्तक परवीन तारीक आणि सलीम महाराज यांना गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्या जबाबातून अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.गॅंगस्टर काही पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीनेच गंभीर गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. काही आयपीएस अधिकाऱ्यांपर्यत त्यांची लिंक असल्याचे सांगितले जात असून खात्याच्या प्रतिमेसाठी ही बाब मारक आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांनी या प्रकरणाच्या मूळापर्यंत जावून शोध घेतला पाहिजे. मुंबईतील अंडरवर्ल्डची पाळेमुळे त्यांना माहित असल्याने या प्रकरणाचा छडा लावतील, अशी आशा व्यक्त केली जात आहेत.